Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखभारतीय युवा संघाचा नववर्षारंभी विजयी डंका!

भारतीय युवा संघाचा नववर्षारंभी विजयी डंका!

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई शहरात वर्षाअखेरचा दिवस भारतीय युवा क्रिकेटपटूंनी गाजवला आणि तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरवला. एकोणावीस वर्षांआतील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार यश धूलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेवर 9 गडी राखून मात केली. या विजयासोबतच आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरले. ही स्पर्धा सलग जिंकण्याची ‘हॅटट्रिक’ही साजरी केली. वर्षाअखेर विजेतेपद पटकावून देशवासीयांना नूतन वर्षाचा अनोखा नजराना पेश केला. मावळत्या वर्षाला निरोप देताना विजयाचा उत्तुंग षटकार खेचून नववर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले. भारत आणि श्रीलंका संघांत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेला मिळाला. त्याचा लाभ उठवून भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येचे आव्हान देण्याचा श्रीलंका संघाचा मानस होता, पण भारताच्या जिगरबाज गोलंदाजांनी सामन्याच्या आरंभापासून चेंडूंचा अचूक मारा करून श्रीलंकन फलंदाजांना नामोहरम केले. 47 धावांत अर्ध्या श्रीलंकन संघाला माघारी धाडले. श्रीलंकेची हालत खस्ता झाली असताना पाऊस धावून आला. दोन तासांच्या खंडानंतर षटके घटवून 38 षटकांचा सामना खेळवण्यात आला. 9 गडी गमावून श्रीलंकेने कशाबशा 106 धावा उभारल्या. पाऊसबाधित सामन्यात डकवर्थ लुइस नियमानुसार भारताला 38 षटकांत 102 धावांचे विजयी लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने एक गड्याच्या बदल्यात 21.3 षटकांत विजयाला गवसणी घातली. नाबाद अर्धशतक करणार्‍या अंगक्रिश रघुवंशीला शेख रशीदची सुरेख साथ मिळाली. वेस्ट इंडिजमध्ये 14 जानेवारीपासून एकोणावीस वर्षांआतील विश्‍वचषक स्पर्धा सुरू होत आहे. त्याआधी आशिया चषक जिंकून विश्‍वचषकाच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचा संदेशच भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघांना दिला आहे असे म्हणता येईल. दुबईतील विजयाने भारतीय युवा संघाचा आत्मविश्‍वास खात्रीने दुणावला असेल. करोनाकाळात सुमारे दीड वर्षे युवा क्रिकेट सामने होऊ शकले नाहीत. पुरेसा सराव नसताना भारतीय संघाने आशिया चषक जिंकला ही प्रशंसनीय बाब आहे, अशा शब्दांत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी संघाचे कौतुक केले आहे. आजच्या तरूण पिढीबद्दल बुजुर्ग मंडळी बर्‍याचदा नकारार्थी सूर लावतात. तरूणाई आव्हाने पेलू शकेल का? असा प्रश्‍न उपस्थित करतात. भारतीय युवा खेळाडूंनी क्रिकेटपुरते तरी त्याचे उत्तर दिले आहे. नवी पिढी आपल्या कर्तृत्वाने चमकत आहे. संधीचे सोने करण्याची धमक तिच्यात आहे याचे सप्रमाण उदाहरण युवा खेळाडूंंनी बुजुर्गांपुढे ठेवले आहे. युवा संघात भविष्यातील अनेक सचिन, सौरव, महेंद्रसिंग, विराट, द्रविड आणि अश्‍विन दडलेले आहेत. पुढे जाऊन हेच युवा खेळाडू भारताच्या राष्ट्रीय संघाला मजबुती देतील. राजकारणातसुद्धा तरुणांना वाव देण्याच्या गप्पा भरपूर केल्या जातात. संधी देण्याची वेळ आल्यावर मात्र जुनी खोडे आपापली जागा सोडू इच्छित नाहीत. राजकारणातील ढुढ्ढाचार्यांनीसुद्धा तरुणाईकरता त्यागाची तयारी ठेवली पाहिजे. एरव्ही फक्त तोंडच्या वाफा दवडण्यात काय हशील? बहुतेक राजकीय पक्षांचा अनुभवी नेत्यांवरच विश्‍वास असतो. त्यामुळे युवकांची पीछेहाट होते. ते नाऊमेद होतात. अर्थात आता अपवादात्मक राजकीय पक्ष तरुणांना संधी देत आहेत, पण हे प्रयत्न तसे नगण्यच आहेत. गुंडांना मात्र हमखास संधी दिली जाते. भारतीय राजकारणाचे हे खास वैशिष्ट्य ठरत आहे. हल्ली विविध घटकांसाठी राजकीय आरक्षण देण्यावर आग्रही भूमिका घेतली जात आहे. तरुणाईला राजकारणात पुरेसा वाव मिळावा म्हणून विधिमंडळ आणि संसदेत त्यांच्यासाठी एखादे विशेष आरक्षण लागू करावे लागेल का? कायद्यात तशा तरतुदी करायला मुरब्बी नेते तयार होतील का? असो, आशिया चषक आठव्यांदा जिंकून देशाचा डंका जगभर वाजवणार्‍या भारतीय युवा संघाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि विश्‍वचषक स्पर्धेसाठी शुभेच्छा!

- Advertisment -

ताज्या बातम्या