आशिया कप २०२५ चा भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेटचा सामना आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानापुढे बांगलादेशच्या संघाने विसाव्या षटका अखेर सर्व गडी बाद १२७ धावा केल्या. भारतीय संघाचा आशिया कप २०२५च्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ७५ धावा करत धडाकेबाज फलंदाजी करत मोठी कामगिरी केली.
नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार जाकर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीला आले. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी फलंदाजीची दमदार सुरुवात केली.सामन्याच्या ७ व्या षटकात रिशाद हुसैनच्या गोलंदाजीवर टी साकीबने शुभमन गिलला झेल बाद केले.शुभमन गिलने १९ चेंडूत २९ धावा केल्या.सामन्याच्या ९ व्या षटकात रिशाद हुसैनच्या गोलंदाजीवर तौहीद हृदोयने शिवम दुबे २ धावा करत झेल बाद झाला. १२ व्या षटकात रिशाद हुसैनने धडाडीचा फलंदाज अभिषेक शर्माला झेल बाद केले. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत ५ षटकार व ६ चौकार लगावत एकूण ७५ धावा केल्या. कर्णधार सुर्यकुमार यादव ११ चेंडूत ५ धावा करत जॅकर अली करवी झेल बाद झाला.
१५ व्या षटकात मोहमद सैफुद्दीनच्या गोलंदाजीवर सैफ हसनने तिलक वर्माला ५ धावांवर झेल बाद केले. हार्दिक पंड्याने २९ चेंडूत ३८ धावा करत टी हसन करवी अखेरच्या षटकात झेल बाद झाला. अक्षर पटेलने १५ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. २० व्या षटका अखेर भारतीय संघाने ६ गडी बाद १६८ धावा केल्या.
बांगलादेशच्या संघाकडून एस हसन व टी हसन प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने टी हसनला १ धाव संख्येवर झेल बाद करत बांगलादेशच्या संघास पहिला धक्का दिला. ७व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने परवेझ हुसैन इमाॅनला २१ धावांवर झेल बाद करत बांगलादेशच्या संघाचा दुसरा गडी बाद केला. १० व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने तौहीद हृदोयला ७ धावांवर झेल बाद करत तंबूत परत पाठविले. पाठोपाठ वरून चक्रवर्तीने शमीम हुसैनला शून्य धाव संख्येवर क्लीन बोल्ड करत बांगलादेशचा चौथा खेळाडू बाद केला.
१३ व्या षटकात सुर्यकुमार यादवने बांगलादेशहा कर्णधार जाकर अलीला चार धावांवर धाव बाद केले. तेराव्या षटका अखेर ९३ धावांवर ५ गडी बाद अशी स्थिती बांगलादेशच्या क्रिकेट संघाची होती. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने रिशाद हुसैनला २ धावांवर झेल बाद केले तर टी साकीबला कुलदीप यादवने शून्य धावांवर क्लीन बोल्ड करत बांगलादेशचा आठवा खेळाडू बाद केला.
सलामीला आलेल्या एस हसनने कडवी झुंज देत ५१ चेंडूत ६९ धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने एस हसनला झेल बाद केले. विसाव्या षटका अखेर बांगलादेशचा संघ सर्व गडी बाद १२७ धावा करू शकला. भारतीय संघाने बांगलादेशवर ४१ धावांनी विजय मिळविला.





