Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar : इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सोशल मिडीयावर महाराजांचे कौतूक अन् टोमणेही

Ahilyanagar : इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सोशल मिडीयावर महाराजांचे कौतूक अन् टोमणेही

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची कन्या चि.सौ.कां. ज्ञानेश्वरी आणि चि. साहिल यांचा साखरपुडा संगमनेरात मोठ्या थाटामाटात पार पाडला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. मुलीची आणि जावयाची रथावरून मिरवणूक, राजकीय मंडळींची उपस्थिती, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेलं कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी असा थाटामाटात साखरपुडा केल्यानंतर समाजातील विविध स्तरांमधून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होतोय. त्याचबरोबर टीका होताना दिसतेय.

- Advertisement -

निवृत्ती महाराज इंदोरीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या विनोदी शैलीने आणि थेट बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रचंड लोकप्रिय झाले. मुलींची वागणूक, समाजातील वाईट रूढी, परंपरा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, गुन्हेगारी, वृत्तीवर ते कायम प्रहार करताना दिसतात. त्यांच्या काही विधानांवरून वेळोवेळी वादही उद्भवले आहेत. आता वैयक्तिक आयुष्यातील या सोहळ्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. यातून वारकरी संप्रयादायातून तसेच सोशल मीडियातून टीका होत आहे.

YouTube video player

इंदोरीकर महाराजांना 1 मुलगी… तिचं नाव ज्ञानेश्वरी… जी उच्चशिक्षित आहे. पुण्याला शिक्षण झालं… तर इंदोरीकरांचा जावईही पुण्याचाच आहे. त्याचं नाव साहिल चिलाप असून तोही मूळ पुण्याचाच आहे. जुन्नर तालुक्यातलं काटेडे येनेरे हे त्यांचं मूळ गाव… पण सध्या नवी मुंबईत राहतो. नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ज्यात शेकडो गाड्या आहेत. वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनिषा आहे.

या सोहळ्यात महाराजांचा पोषाख साधाच होता. साखरपुड्यात त्यांनी जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं. एवढेच नव्हेतर कुणाचाही सत्कार न करता पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी 1 लाख 11 हजार रूपयांचा निधीही दिला. त्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. पण त्याचवेळी साखरपुड्यात केलेल्या थाटामाटावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकांकडून जोरदार टीका होत आहे. कित्येकांनी त्यांना टोमणेही मारले आहेत. इंदोरीकर महाराज किर्तनात सांगतात… मुलींची लग्न साध्या पद्धतीनं करा. कर्ज काढून लग्न करायची गरज नाही. लग्नात शोबाजी, पैशांची उधळपट्टी करायची काय गरज? आणि मुलींनाही हे समजायला हवं, की बापावर किती कर्जाचं ओझं करायचं. आधीच तिच्यासाठी एवढा पैसा खर्च करायचा… आणि लग्नावेळीही बापानं कर्जात जायचं, याला काय अर्थ आहे…

याच वक्तव्यावरुन सोशल मीडियावर, की जर तुम्हीही मुलीचा साखरपुडा साध्या पद्धतीनं करुन समाजापुढं आदर्श ठेवला असता तर काय झालं असतं, पण नाही…, तुम्हीही तेच केलं, जे लोक करतात..अशी टीका अनेकांनी केली आहे.
जे इतरांना सांगतात ते स्वतःही आचरणात आणावं असं म्हणत मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदोरीकर महाराजांवर टीका केली. साखरपुडा एवढा थाटामाटात केला तर लग्नात किती खर्च होईल, असा सवालही अनेकांनी विचारला आहे.

या टीकेला आता इंदोरीकर महाराजांनी उत्तर महाराज म्हणाले, मला तक्रार आली की, मी हे लग्न साध्या पद्धतीने करा असं सांगतो आणि मुलीचा साखरपुडा थाटामाटात केला. वीस वर्षे लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो. पण आता इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कार करायचा नाही असा बदल करण्याचं ठरवलं. करायचा तर सगळ्यांचाच नाहीतर एकाचाही नाही. एवढ्या मोठ्या पद्धतीने साखरपुडा हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला. की आपण बदल करू शकतो. बदल करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. साखरपुड्यात जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीने ठेवलं.

चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही. त्याच्यासाठी आठ दिवस वाद केला, पण जेवण महाराष्ट्रीयनच ठेवलं. जेवण वाढणार्‍यांचा ड्रेस वारकर्‍यासारखा ठेवला. कारण सगळ्यांना समान वागणूक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुर्ची नाही. ज्याला आजार आहे त्यांनीच खुर्चीवर बसायचं. वारकरी संप्रदायाने जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवले. कोणाला कमी पाहिलं नाही. कोणाची स्तुती केली नाही. निंदा केली नाही. मी शेतकर्‍याचा मुलगा आहे. लोकांचा आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो. असं स्पष्टीकरण दिलं.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...