Tuesday, October 22, 2024
Homeनगरउद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे - ना. सामंत

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य द्यावे – ना. सामंत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे निर्माण होणारा औैद्योगिक विकास जिल्ह्याची नवी ओळख करुन देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येणार्‍या डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी व परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. येणार्‍या उद्योजकांनीही स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.

- Advertisement -

सावळीविहीर येथे शिर्डी औद्योगिक विकास महामंडळ व डिफेन्स क्लस्टरचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास आ. आशुतोष काळे, जिल्हा बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, निबे लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे आदी उपस्थित होते. उद्योगमंत्री म्हणाले, येत्या काळात राज्यात पाच ठिकाणी डिफेन्स क्लस्टर सुरू करण्यात येणार आहेत. यातील एक डिफेन्स क्लस्टर शिर्डी एमआयडीसीत सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून 1200 कोटींची गुंतवणूक होणार आहे. राज्य शासनाचे धोरण उद्योगाला प्रोत्साहन देणारे आहे.

महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 30 हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प सुरू होत आहे. यात 80 टक्के स्थानिक तरूणांना परदेशात प्रशिक्षण देऊन या प्रकल्पात कायम नोकरी दिली जाणार आहे. येत्या काळात शिर्डी बरोबर कोपरगाव शहरात एमआयडीसी आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. ना. विखे पाटील म्हणाले, एमआयडीसी शिर्डी व परिसरातील युवकांसाठी नवा आशेचा किरण आहे. या माध्यमातून हजारो तरूणांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. कोपरगावात एमआयडीसी उभारण्यासाठी शेती महामंडळाची 300 एकर जागा विनाशूल्क उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही देतानाच जिल्ह्यामध्ये अधिकची गुंतवणूक यावी हा आपला प्रयत्न असून जिल्ह्यामध्ये औद्योगिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिर्डी एमआयडीसीमुळे शिर्डी, राहाता, कोपरगाव या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी साईबांबा देवस्थान म्हणून जगभर ओळखले जाते. यापुढे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल, असा विश्वासही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आ. आशुतोष काळे यांचेही यावेळी भाषण झाले. कोपरगाव येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्याची मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. उद्योजक गणेश निबे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विकसित होणार्‍या डिफेन्स क्लस्टर उद्योगाची माहिती दिली. लार्सन अ‍ॅन्ड टर्बो कंपनीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य जयंत पाटील यांनी डिफेंन्स क्लस्टच्या संदर्भात माहिती देवून अशा पध्दतीचा सहावा प्रकल्प हा या ठिकाणी विकसीत होत असल्याचे सांगितले.

सावळीविहीर येथील शेती महामंडळाच्या 502 एकर जागेवर शिर्डी एमआयडीसी साकार होणार आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रूक व सावळीविहीर खुर्द तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावांच्या क्षेत्रात एमआयडीसीची जागा महसूल मंत्री विखे पाटील यांनी उपलब्ध करुन दिली. शासनाच्या जमिनीवर भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी ठरणार आहे. रस्ते आणि वीज विकासासाठी 100 कोटी रुपयांची मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या