Thursday, May 2, 2024
Homeनाशिककांदा चाळ बनविण्यासाठी मिळेना साहित्य

कांदा चाळ बनविण्यासाठी मिळेना साहित्य

विंचूर । Vinchur

शासनाने लावलेल्या जनता कर्फ्यू मुळे सर्व दुकाने बंद झाल्याने शेतकर्‍यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांचा कांदा शेतातच पडून असून तो साठविण्याची पंचाईत झाली आहे.

- Advertisement -

अशातच हा कांदा रणरणत्या उन्हामुळे त्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळविण्यासाठी शेतकर्‍याची धावपळ दिसून येत आहे.

संचारबंदीमुळे अनेक शेतकर्‍यांना कांदा चाळ बनविण्यात अडचणी येवू लागल्या आहे. अशा परिस्थितीत जनता कर्फ्यू केव्हा संपेल याची चिंता शेतकर्‍याला भेडसावू लागली आहे. कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे बियाणे दोन ते तीन वेळेस टाकूनही कांदा रोपे तयार झाली नाही. शेवटी मिळेल त्या भावात शेतकर्‍यांना बियाणे खरेदी करावे लागले. त्यात बर्‍याच शेतकर्‍यांची फसवणूक झाली.

अशा अनेक संकटांमुळे कांदा उत्पादक शेतकरी आधीच हैराण झालेले असतांना या सगळ्या संकटातून पिकलेल्या कांद्याला दर कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद असल्याने कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकर्‍यांवर येवून ठेपली आहे. काढलेला कांदा साठवून ठेवण्यासाठी कांदा चाळ बनवण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत.

मात्र ऐन उन्हाळ कांद्याच्या काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाऊनमुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी अँगल, पट्टी, जाळी, पत्रे यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकर्‍यांचा कांदा कडक उन्हात पडून आहे. उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते.

त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल. काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीखाली कांद्याची पोळ मारून ठेवताना दिसत आहे. एकूणच शेतकर्‍यांवर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अनेक संकटे येत असून त्याला सामोरे जाताना शेतकरी हवालदिल झाले आहेत.

विक्रीअभावी कांदा पडून

मागील खरीप हंगामात करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने निर्यात खुली होऊनही फायदा झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले होते. यंदाही संकटाची पुनरावृत्ती झाल्याने विक्री अभावी माल शेतात पडून राहिल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहेत.

-सोमनाथ घायाळ, कांदा उत्पादक

- Advertisment -

ताज्या बातम्या