मुंबई | प्रतिनिधी Mumbai
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग एक दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक घोषित झाल्याने राज्यात आचारसंहिता लागू असताना दुपारी साडेतीन वाजल्यानंतर जे शासन निर्णय जारी झाले त्याची चौकशी करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतरही आमदारांच्या निधी वाटपासह प्रशासकीय प्रकल्पांना मान्यता, बदल्या, नियुक्त्यांचे शासन निर्णय जारी केले. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, कोणते शासन निर्णय जारी केले ते तपासले जाईल, असे एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या पार्श्वभूमीवर चोक्कलिंगम यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीत समाज माध्यमांद्वारे पोस्ट केल्या जाणार्या आक्षेपार्ह संदेशांची पडताळणी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी समाज माध्यमांच्या आस्थापनांसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली आहे. त्यामुळे आक्षेपार्ह संदेशांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल तसेच चुकीची माहिती देणार्या संदेशांविषयी योग्य माहिती देण्यात येईल, असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.