Friday, May 3, 2024
Homeनाशिकमच्छी बाजार, भाजी बाजार उभारल्यास तीव्र आंदोलन

मच्छी बाजार, भाजी बाजार उभारल्यास तीव्र आंदोलन

इंदिरानगर । वार्ताहर Indira Nagar

देवळाली-पाथर्डी रस्त्यालगत प्रभाग क्रमांक 31 मधील सर्व्हे क्रमांक 911 मधील मोकळ्या जागेत महापालिकेने मच्छी बाजार अथवा भाजी बाजार उभारण्यासाठी प्रयत्न केले तर या नागरिकांसमवेत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक नगरसेविका संगीता जाधव व पुष्पा आव्हाड यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी शेकडो सह्या असलेले निवेदन विभागीय अधिकारी मयुर पाटील यांना दिले.

- Advertisement -

सन 2018 साली देखील मनपाने स्टेट बँकेसमोर असलेल्या या जागेवर भाजीबाजारासाठी चाचपणी केली होती. तेव्हा देखील नागरिकांनी प्रखर विरोध केल्याने मनपाने तो विषय सोडून दिला होता. या ठिकाणी वनराई अंतर्गत वृक्ष लागवड करावी, अन्यथा वाचनालय किंवा समाज मंदिर बांधावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक करत आहेत. मात्र याचा विचार न करता तथाकथीत पुढार्‍यांच्या मागणीचा विचार करून भाजी अथवा मच्छी बाजारासाठी येथे चाचपणी केली जात असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.

नागरिकांना हव्या असलेल्या सुविधांसाठी निधी देण्याची तयारी देखील दोघा नगरसेविकांनी दाखवली आहे. नगरसेवक सुदाम डेमसे आणि भगवान दोंदे यांच्या पुढाकाराने मुरलीधर नगर येथे भाजीबाजार बसवण्यात आला. विक्रेत्यांनीच ओट्यांचे वाटप करून घेतले. मात्र तेथे देखील भाजीविक्रेते समाधानी नाहीत. मच्छी बाजाराचे मोठे अतिक्रमण या रस्त्यावर झाले असून या समस्यांचा कायमस्वरूपी विचार न करता रहिवासी भागात बाजार बसवणे योग्य नाही, अशा भावना नागरिकांनी, विशेषत: महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान नागरिकांची मागणी असलेल्या उपक्रमांना येथे प्राधान्य द्यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्थानिक नागरिक दिपक केदार, रवि राठोड, सुरेखा दिवटे, बापू बोरसे, अमोल मोडक, भारती आहेर, संजय आहेर, डॉ. मीना मोरे, रोहिणी केदार, बाळू धोंड, विठ्ठल काळे, राजेश अग्रवाल, किरण आहेर, शुभम ब्राह्मणे आदींसह नागरिकांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या