अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी अहिल्यानगर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून आता आधुनिक इंटरसेप्टर वाहन कार्यरत करण्यात आले आहे. हे वाहन जिल्हा पोलीस दलाला विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार प्राप्त झाले असून, याच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित केले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या निर्देशांनुसार राज्यातील महामार्ग पोलीस तसेच जिल्हा पोलीस घटकांना इंटरसेप्टर वाहने देण्यात आली आहेत. या अत्याधुनिक वाहनांमध्ये 4 डी रडार स्पीडगन, ब्रेथ अॅनालायझर, टिंट मीटर, पी. ओ. सिस्टम, प्रथमोचार किट, तसेच फायर एक्स्टिंग्विशर अशी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. या साधनसामग्रीच्या साहाय्याने वाहनचालकांनी केलेल्या वेगमर्यादेच्या उल्लंघनासह, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहनाच्या काचा ब्लॅक फिल्मने झाकणे, तसेच इतर विविध वाहतूक नियमभंग करणार्या घटनांवर त्वरित कारवाई करता येणार आहे. शहर वाहतूक शाखेकडून या वाहनावर कार्य करण्यासाठी प्रशिक्षित एक अधिकारी आणि दोन पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली असून, ते नियमितपणे शहरातील विविध ठिकाणी गस्त घालून नियमभंग करणार्यांवर कारवाई करतील.
मंगळवारी (11 नोव्हेंबर) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित समारंभात या इंटरसेप्टर वाहनाचे अनावरण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी, मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेमदिप माने, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते. यावेळी एसपी घार्गे यांनी सांगितले की, रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक आहे. इंटरसेप्टर वाहनाव्दारे कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर काटेकोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी स्वतःहून वाहतूक शिस्त पाळावी, असे आवाहन त्यांनीकेले.




