Saturday, April 4, 2026
HomeनगरAhilyanagar : खाद्यजत्रेतून महिला सक्षमीकरणाचा संदेश - विखे पाटील

Ahilyanagar : खाद्यजत्रेतून महिला सक्षमीकरणाचा संदेश – विखे पाटील

बचत गटांच्या उद्योजकतेला नवे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचा व्यक्त केला विश्वास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला बचतगटांच्या खाद्य पदार्थांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील महिला बचत गटांनी उभारलेल्या स्टॉलमधून विविध खाद्यपदार्थांची चव जिल्हावासीयांना चाखता येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा परिषद, अहिल्यानगर व जनसेवा फाउंडेशन, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी, नगर येथे आयोजित ‘अहिल्यानगरची जत्रा’ फूड फेस्टिव्हल प्रदर्शनाच्या भेटी प्रसंगी पालकमंत्री डॉ.विखे पाटील बोलत होते. यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही खाद्यजत्रा आयोजित करण्यात आली असून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे.

उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील बचत गटांना 78 कोटी रुपयांचा समुदाय गुंतवणूक निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच राज्यात 1 लाख 80 हजार लखपती दीदी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यात सर्वाधिक लखपती दीदी तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे. गतकाळात साई ज्योती उपक्रमातून जिल्ह्यातील बचतगटांना मोठी चालना मिळाली असून येत्या काळातही महिलांना विविध व्यवसायांद्वारे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत असेच उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले

आ. जगताप म्हणाले की, पालकमंत्री डॉ.विखे पाटील यांच्या संकल्पनेतून खाद्य महोत्सव उपक्रम राबविण्यात आला आहे. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करत कुटुंबाचा भक्कम आधार बनविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. महिलांची ओळख एक यशस्वी उद्योजिका म्हणून निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी फूड फेस्टिव्हलमध्ये विविध स्टॉलला भेट देत स्थानिक खाद्यपदार्थ व उत्पादनांची माहिती घेतली. जिल्ह्यातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ व उत्पादनांचे त्यांनी कौतुक केले.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासंबंधित विकास कामांची मुख्य सचिव राजेश अग्रवाल...

0
नाशिक | जिमाका वृत्तसंस्था Nashik सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विषयक कामांना मुख्य सचिव राजेश अग्रवाल...