Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजि.प. सदस्यांकडून रस्त्याचा निधी हडपण्याचा डाव

जि.प. सदस्यांकडून रस्त्याचा निधी हडपण्याचा डाव

नाशिक । Nashik

जिल्हा परिषदेच्या बांधकाम(इमारत व दळणवळण)च्या तीनही विभागांना राज्य रस्ते दुरुस्तीचा तीन काेटींचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी इतर सदस्यांना अंधारात ठेवून काही ठराविक सदस्यांनी त्याचे परस्पर नियोजन करत तो हडप करण्याचा प्रयत्न काही सुरू असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

दरम्यान,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांधकाम समितीची मंजुरी दिल्याशिवाय नियोजनास मान्यता दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या सदस्यांचे मनसुबे उधळणार असे चित्र आहे..

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून रस्त्यांसाठी निधी प्राप्त होतो. यावर्षी मंजूर झालेल्या नियतव्ययानुसार या निधीचे नियोजन पूर्ण झाले आहे.दरम्यान, बांधकाम विभागाला राज्य रस्ते दुुरुस्तीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

सदस्यांना याची माहिती देण्याऐवजी बांधकाम समितीच्या काही सदस्यांनी मात्र हा निधी ठराविक सदस्यांमध्येच वाटप करून निधी लाटण्याचा डाव असल्याचे समोर आले आहे.यासाठी त्यांनी त्या त्या तालुक्यातील ठेकेदारांना बोलावून तुम्हाला निधी देतो, असे आश्वासनही दिले आहे. मात्र, त्या तालुक्यातील सदस्यांना याची कुणकुणही लागू दिली नसल्याचे समजते. या निधीबाबत बहुतांश सदस्य अंधारातच आहेत.

बांधकाम समितीच्या सभेपूर्वीच या निधीचे नियोजन करण्याबाबत या सदस्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र, बांधकाम समितीच्या ठरावाशिवाय या निधीचे नियोजन करण्यास अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त केल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळणच्या तीनही विभागांना प्रत्येकी एक कोटी रुपये राज्य रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त झाले आहेत. त्यातील काही निधी दायीत्वावर खर्च होणार आहे. त्याचे नियोजन अजून सुरू आहे.

– डॉ. सयाजी गायकवाड, उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती जिल्हा परिषद नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या