Friday, May 3, 2024
Homeनाशिकचार क्षेत्रातील गुंतवणूक नाशकात आणणार

चार क्षेत्रातील गुंतवणूक नाशकात आणणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आणण्यात एमआयडीसीला ( MIDC ) कोविड नंतरच्या काळात यश आले आहे.त्यात 98 करारातून 4 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक ( Investment ) राज्यात झाली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 3 लाख 30 हजार रोजगारांची निर्मिती होणे शक्य होणार आहे. राज्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी विविध 14 क्षेत्रांची निवड केली आहे. त्यातील फार्मासिटीकल, टेक्सटाईल, डिफेन्स व एरोस्पेस, तसेच फूड प्रोसेसिंग उद्योग या 4 क्षेत्रातील गुंतवणुका नाशिक विभागात आणण्यासाठी एमआयडीसी कटीबध्द असल्याचे एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजीत घोरपडे (MIDC General Manager Abhijeet Ghorpade )यांनी सांगितले.

- Advertisement -

‘आयमा इंडेक्स 2022’ ( AIMA Index-2022 )या औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोप समारंभात घोरपडे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिंदाल स्वॉचे अध्यक्ष दिनेश सिन्हा, एचएएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक एस.ए.कोठे,एपीरॉकचे महाव्यवस्थापक अरविंद पाटील, ग्रिन स्पेसच्या व्यवसाय प्रमुख निकीता कटाळकर, भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आयमा अध्यक्ष निखील पांचाळ, आयमा इंडेक्स अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणिस ललित बूब, माजी अध्यक्ष वरुण तलवार, कार्यकारीणी सदस्य सतिष कोठारी हे होते.

यावेळी बोलताना घोरपडे यांनी सांगितले की, जागतिकीकरणानंतर भारताच्या औद्योगिक विकासाने गती घेतली असून राज्याच्या औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 40 अब्ज डॉलर्सचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असल्याचे सांगितले. जेएनपीटीवरील ताण कमी करण्यासाठी पालघर डहाणू बंदरावर वाधवान बंदर उभारण्याला गती देण्यात आली आहे. ते पूर्ण झाल्यानंतर जेएनपीटी जगातील बंदरांमध्ये दहा क्रमांकाच्या आत येईल असा विश्वास व्यक्त केला. राज्याचा आढावा सादर करताना 225 लाख क्षेत्रात राज्यात 221 औद्योगिक वसाहती असल्याचे सांगितले.

यावेळी एचएएलचे ( HAL ) काठे यांनी उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यात आयमा इंडेक्सचा मोठा भाग असल्याचे सांगितले. एचएएलच्या माध्यमातून नाशिकच्या कारखान्याने पूर्वी मिग नंतर सुखोई निर्माण केले. आता येणार्‍या काळात तीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे सांगून त्यात प्रामुख्याने हिन्दुस्थान टर्बो ट्रेनर, अनमॅन एअर व्हेईकल व मेडीयम कॉम्बॅक्ट एअर क्राफ्ट या तीन उत्पादनांवर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले.यासाठी बीटूबीच्या माध्यमातून उद्योजकाशी संपर्क साधला.

नवीन व्हेंडर तयार करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यात प्रामुख्याने मशिनींग, फॅब्रीकेशन,शिटमेटल, टूलींग व ग्राऊंड हॅन्डलींग याप्रकारात काम करु इच्छिणार्‍या उद्योगांना आमंत्रित करण्यात आले आहे. बीटूबीच्या माध्यमातून उद्योजकांना नोंदणी व इतर प्रशासकिय प्रक्रियांची माहिती देण्यात आली. रशिया- युक्रेन युध्दामुळे एचएएलला रशियातून होणारा पुरवठा परिणामीत होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने नाशिकच्या उद्योजकांसाठी ही संधी असून भारतीय बनावटीचे उत्पादन तयार करण्याच्या प्रयत्नातून नाशिकमध्य्ग एरोस्पेस क्लस्टर उभे राहील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी एपीरॉकचे अरविंद पाटील यांनी महिला शक्तीला प्रमोशन देण्याचे धोरण हाती घेण्यात आले असून येणार्‍या काळात विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांना उत्पादनात संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपिठावरील दिनेश सिन्हा, लक्ष्मण सावजी व निकीता कटाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्टॉलधारकांच्या वतीने भाबड, कृष्णा हांडगे, नम्रता शाह यांनी मनोगत व्यक्त करुन अनुभव कथन केले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट करुन त्यात येणार्‍या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी एमआयडीसीने पुढाकार घेऊन कायमस्वरुपी प्रदर्शन केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

पाहुण्याचें स्वागत करताना आयमा इंडेक्स अध्यक्ष धनंजय बेळे यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासाला मिळालेल्या गतीबद्दल गौरवोद्गगार काढले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 850 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले असल्याचे सांगितले तर शेवटच्या दिवशी 1150 कोटींच्या नव्या गूंतवणुकीची घोषणा करुन एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजीत घोरपडे यांच्ंया हस्ते सामंजस्य करार हस्तांतरीत करण्यात आले.

सामंजस्य करारांनी समारोप

ज्योस्टिक कंपनीद्वारे जर्मनीच्या पिकापॅक उद्योगासोबत 60 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचा करार करण्यात आला.यावेळी जुही व अद्वेत जोगळेकर यांना कराराचे पत्र देण्यात आले.

जिंदाल सॉ या सिन्नरच्या उद्योगाने 250 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर नाशिकच्या ब्राईट सिनो प्रा.लि. या उद्योगाने 850 कोटींची गूंतवणूक करण्याचा करार केला आहे. त्यांच्या माध्यमातून येणार्‍या काळात सुरत -चेन्नई एक्स्प्रेस हायवेवर 850 एकरावर इंटीग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप उभारण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या