Thursday, May 2, 2024
Homeनगरसाई प्रसादलायचा मराठमोळा मेनू थेट राष्ट्रपती भवनात; संस्थानच्या दोन आचार्‍यांना राष्ट्रपती भवनाचे...

साई प्रसादलायचा मराठमोळा मेनू थेट राष्ट्रपती भवनात; संस्थानच्या दोन आचार्‍यांना राष्ट्रपती भवनाचे निमंत्रण

शिर्डी । प्रतिनिधी

साईसंस्थानच्या प्रसादालयातील मराठमोळं मेनूचा स्वाद थेट राष्ट्रपती भवनात पोहचला असून या पदार्थांची रेसीपी जाणून घेण्यासाठी साई संस्थानच्या दोन आचार्‍यांना 15 दिवसांसाठी राष्ट्रपती भवनात निमंत्रीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या 7 जुलै रोजी राष्ट्रपती दौपदी मुर्मू साई दर्शनाच्या निमित्ताने शिर्डीत आल्या होत्या़. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीसह साई संस्थानच्या प्रसादालयात भोजन केले होते़ राष्ट्रपतींसाठी संस्थानच्या प्रसादालयातच भोजन बनवण्यात आले होते. यात गावरान मटकी, मेथी, बटाटा भाजी, डाळ, भात, चपाती, बटाटे वडा, पाव, शिरा, बुंदीचा लाडू तसेच विविध प्रकारच्या चटण्यांचा समावेश होता़. राष्ट्रपतींना जेवण व त्यातील शेंगदाणा चटणी विशेष आवडली़ जेवणानंतर त्यांनी आचार्‍यांकडून चटणीची रेसिपी जाणून घेतली़

राष्ट्रपती भवनातील आचार्‍यांनी चटणीचा सॅम्पलही बरोबर नेला होता़. त्यावेळी माध्यमांतून चटणीचा विशेष उल्लेख झाल्याने भाविक आवर्जुन चटणीचा स्वाद घेत आहेत. शिर्डी दौर्‍यानिमित्त राष्ट्रपतींसाठी जेवण बनवणार्‍या आचार्‍यांना पंधरा दिवसासाठी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात बोलवण्यात आले आहे. त्यानुसार साईबाबा संस्थानने राहाता तालुक्यातील नपावाडी येथील रविंद्र वहाडणे व श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील प्रल्हाद कर्डिले या दोघांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे़. आज शनिवार दि. 29 जुलै रोजी हे दोघे रेल्वेने दिल्लीला रवाना होत आहेत़

साईसंस्थानचे आचारी शेंगदाणा चटणी, वडा-पावसह अन्य महाराष्ट्रीयन पदार्थाच्या रेसिपीज राष्ट्रपती भवनातील आचारी यांना शिकवणार आहेत़ संस्थानच्या या दोन्ही आचार्‍यांना येण्या-जाण्याची, निवासाची सर्व व्यवस्था राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे़ साई संस्थानचे प्रसादालय आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालय असून त्यास आयएसओ मानांकन प्राप्त आहे़. वर्षाकाठी या प्रसादालयात जवळपास दिड कोटी भाविक प्रसाद भोजन घेतात़. या निमीत्ताने महाराष्ट्रीन मेनू राष्ट्रपती भवनात पोहचणार आहे. साई संस्थानच्या प्रसादालयातील स्वच्छता, अन्न पदार्थांचा दर्जा, स्वाद भाविकांच्या पसंतीला उतरले आहेत. राष्ट्रपतींकडून मिळालेली पसंतीची पावती साईसंस्थानच्या व शिर्डी परिसराच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या