मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट (IPL) स्पर्धेचा म्हणजेच आयपीएलचा आगामी १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा सलामीचा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळविण्यात येणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे पार पडलेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपये खर्च करून खरेदी केले होते. त्यानंतर पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपविले होते. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाची (Kolkata Knight Riders) श्रेयस अय्यरने साथ सोडल्यानंतर नवीन कर्णधार कोण होणार? याची उत्सुकता कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड होती. त्यानंतर आता कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल लिलावात अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) १.५ कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात स्थान दिले होते. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य रहाणे, रिंकुसिंग, व्यंकटेश अय्यर, मनीष पांडे, सुनील नारायण हे दिग्गज शर्यतीत होते. पण क़ोलकाता नाईट रायडर्स संघाच्या संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. तसेच व्यंकटेश अय्यरकडे (Venkatesh Iyer) उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात मुंबई संघाने इराणी करंडक क्रिकेट स्पर्धा, तसेच रणजी ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर अजिंक्य रहाणे याने राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. अजिंक्य राहाणेच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०१८ मध्ये बाद फेरीत आपला प्रवेश निश्चित केला होता.
दरम्यान, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद (Captaincy) सोपवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सीईओ वेंकी मयसुर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, “अजिंक्य रहाणे सारखा परिपक्व आणि उत्कृष्ट कर्णधार आम्हाला लाभला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. तर अजिंक्य रहाणेने कर्णधारपद मिळाल्यानंतर म्हटले की,”कोलकाता नाईट रायडर्स हा आयपीएल क्रिकेट स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे”, असे त्याने म्हटले. यापूर्वी कोलकाता नाईट संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली, जॅक कॅलिस, डेव्हिड हसी, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, ब्रेंडन मॅकालम, श्रेयस अय्यर या दिग्गज खेळाडूंनी सांभाळले आहे.