मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan) ‘अघोषित युद्ध’ शनिवारी युद्धबंदीद्वारे संपुष्टात आले आहे. या तणावामुळे आयपीएल २०२५ (IPL 2025) ची स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेतील फायनलचा सामना २५ मे रोजी होणार होता. मात्र, आता आयपीएलच्या स्पर्धेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेतील फायनलचा सामना (Final Match) ३० मे रोजी खेळवला जाऊ शकतो. तर या स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १६ मे पासून सुरूवात होणार असल्याचे म्हटले जात आहे. या स्पर्धेतील सामने चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये खेळवले जाणार आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धेतील एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी ५८ सामने पूर्ण झाले आहेत. तर १६ सामने अजूनही शिल्लक आहेत. ज्यात प्लेऑफच्या सामन्यांसह फायनलचा देखील समावेश आहे.
तसेच, या स्पर्धेचे सुधारीत वेळापत्रक (Time Table) आज संध्याकाळपर्यंत जाहीर केले जाऊ शकते. दुसरीकडे बीसीसीआयने पंजाब किंग्ज संघाला वगळता इतर सर्व संघातील खेळाडूंना येत्या मंगळवारपर्यंत आपापल्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगितले आहे. तर काही संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य मायदेशी परतले आहेत. त्यामुळे आता या खेळाडूंना पुन्हा बोलवण्याचे आदेश बीसीसीआयनें (BCCI) फ्रँचायझींनी दिले असल्याचे समजते.
दरम्यान, गेल्या गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS and DC) यांच्यातील सामना तणावपूर्ण परिस्थितीमुळे रद्द करण्यात आल्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. जर ही युद्धबंदी झाली नसती तर बीसीसीआयला सुमारे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलली होती.