आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात वाद निर्माण झाला. गुजरातचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा याला आचारसंहिता भंग केल्याने मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला. त्याच्या नावावर एक डिमेरिट पॉईंटही नोंदला गेला.
ईशांतला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही, पण त्याच्या आक्रमक आणि अयोग्य वर्तनाने सर्वांचं लक्ष वेधलं. आयपीएलच्या आचारसंहिता 2.2 अंतर्गत, मैदानावरील वस्तूंना किंवा उपकरणांना मुद्दाम नुकसान करणं हा लेव्हल 1 गुन्हा आहे. सामना संपल्यानंतर ईशांतने मॅच रेफरीचा निर्णय स्वीकारला. आयपीएल नियमांनुसार, लेव्हल 1 गुन्ह्यांवर रेफरीचा निर्णय अंतिम असतो आणि अपील करता येत नाही. रागावर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान आता ईशांतपुढे आहे.
आचारसंहिता 2.2 मध्ये स्टंप्स, जाहिरात बोर्ड, बाउंड्री फेन्स किंवा ड्रेसिंग रूमच्या दरवाजांना हानी पोहोचवणाऱ्या कृतींचा समावेश होतो. ईशांतवर याच कारणासाठी कारवाई झाली.या सामन्यात गुजरातने सनरायजर्सवर 7 विकेट्सने मात केली. SRH ने 152 धावा केल्या, पण गुजरातने सलग तिसरा विजय मिळवत गुणतक्त्यात दुसरं स्थान पटकावलं. गुजरातच्या गोलंदाजांनी कमाल दाखवली. मोहम्मद सिराजने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.