Friday, May 3, 2024
Homeनगरजैन समाजातील 150 तपस्वींची श्रीरामपुरात भव्य शोभायात्रा

जैन समाजातील 150 तपस्वींची श्रीरामपुरात भव्य शोभायात्रा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जैन स्थानकात चातुर्मासनिमित्त झालेल्या नवरंगी तपामध्ये सहभागी झालेल्या एकशे पन्नास तपस्वींची शहरातून भव्य दिव्य शोभायात्रा (वरघोडा) काढण्यात आली. या शोभायात्रेने श्रीरामपुरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शिस्तबध्दपणे निघालेली शोभायात्रा लक्ष वेधणारी होती.

- Advertisement -

जैन साध्वी प्रज्ञाज्योती विश्वदर्शनाजी व विद्याभिलाषी तिलकदर्शनाजी यांनी पर्युषण पर्व काळापूर्वी नवरंगी तपाचे आवाहन भाविकांना केले होते. जैन धर्मीय भाविकांकडून प्रथमच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 7 ते 84 वयापर्यंतच्या भाविकांनी नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार व तीन असे निरंकार उपवास केेले. या तपस्वींची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सुमारे वीस सजवलेल्या बग्ग्या, जीप व पाच ट्रॅक्टर यामध्ये 150 तपस्वींना फेटा बांधून बसविण्यात आले होते. जैन स्थानकापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. नासिकरोडच्या महाराष्ट्र बॅण्डने संत व तिर्थंकरांचे भक्तीवर गाणे वाजविली तर श्रीरामपूरच्या काचमंदिर परिसरातील डोली बाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

शोभायात्रा शिवाजी रोड, मेनरोड फिरून जैन स्थानकात आली. चौकाचौकांत, महिला, युवती, तरुण व ज्येष्ठ नागरिकही आनंदाने नाचत व फुगडी खेळत होते. भाजपाचे प्रकाश चित्ते, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राजश्रीताई ससाणे, दीपाली करण ससाणे, दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय कासलीवाल, उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास चुडिवाल, अनिल पांडे, सर्व विश्वस्त व कार्येकर्ते तसेच संभवनाथ जैन मंदिराचे अध्यक्ष शैलेशभाई बाबरीया, अमित गांधीसह सर्व विश्वस्त, समाजबांधव व भगिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

स्थानकात विश्वदर्शनाजी यांचे आशिर्वादपर प्रवचन झाले. तिलकदर्शनाजी यांचे स्तवन झाले. तपस्वींचा अ‍ॅड. सुरेश, रमेश, अमोल, डॉ. पियुश व सौरभ बांठिया परिवाराच्यावतीने बॅग तर सुरेश कुंदनमल गदिया परिवाराच्यावतीने चांदीचा शिक्का देवुन गौरव करण्यात आला. यावेळी रमेश, सचिन, अमोल, कमलेश, संदिप गुंदेचा परिवार व चातुर्मास कमिटीच्यावतीने गौतमप्रसादीची तर बॅण्डची व्यवस्था अभय, अमित, सुमित व नवीन मुथा परिवाराने केली होती. प्रास्ताविक ज्येष्ठ सदस्य रमेश कोठारी यांनी केले तर संगिता ललित कोठारी यांनी भाषण केले. सूत्रसंचालन दीपक संघवी यांनी केले. यावेळी पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, जालना येथील जैन बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या