अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जलजीवन मिशन पाणी योजनांबाबत आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी नियुक्त केलेल्या दोन तपासणी पथकांना येत्या महिन्याअखेर तपासणीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात योजनांची सद्यस्थितीसह त्रुटी व जबाबदारी निश्चितीचा उल्लेख करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण व उपकार्यकारी अभियंता सुधीर आरळकर अशी दोन पथके तयार करण्यात आली असून ते तपासणी करीत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्याकडे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांच्या आतापर्यंत 25 ते 30 तक्रारी आल्या असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षापासून जलजीवन मिशन योजना वादग्रस्त ठरली आहे. सुरवातीपासून या योजनांबाबत तक्रारी होत आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्याकडे आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन पथके स्थापन केली आहेत. पथकामार्फत करण्यात येणार्या तपासणीच्या वेळी संबंधीत गावाचे सरपंच, ग्रामसेवक, पाणी योजनेचे काम करणारा ठेकेदार, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. तपासणीत पाईपलाईनचे काम योग्य पद्धतीने झाले आहे का, पाण्याची टाक्याची गळती, पाईपची गळती, पाणी पूर्ण दाबाने मिळते का, अंदाजपत्रकात समावेश असलेल्या सर्व घरांना पाणीपुरवठा होतो का, पाईप योग्य पद्धतीने गाडले गेले का अशा प्रकारे तपासणी करण्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत तपासणी समितीने दहा ते बारा योजनांची तपासणी पूर्ण करून त्यांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांना दिला आहे. मात्र, त्यात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात योजनांच्या सद्यस्थितीबाबत उल्लेख आहे. त्रुटी व त्या पूर्ण करण्यासाठी कोण जबाबदार आहे. याचा उल्लेख नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी त्रुटीचा अहवालात उल्लेख करण्याच्या सुचना देऊन येत्या महिन्याअखेरपर्यंत आलेल्या 25 ते 30 तक्रारीचा अहवाल देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दोन्ही पथकांना दिले आहेत.




