जळगाव | Jalgaon
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे नेते (NCP Leader) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर भागातील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आली. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर चोरट्यांनी दरोडा टाकला होता. त्यातच एकनाथ खडसे यांच्या घरी आता चोरी झाल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. यानंतर आता आमदार एकनाथ खडसे यांच्या घरातून किती रक्कम आणि कोणते दागिने चोरीला गेले याची यादी समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खडसे यांच्या घरातील तळमजल्यावरील गोपाळराव सरोदे यांच्या रूममधून गहू पोत २० ग्रॅम,कानातील ०४ ग्रॅम,कानातील ०३ ग्रॅम, डायमंड कर्णफुल ०४ ग्रॅम, अंगठी ०२ नग एकूण ०७ ग्रॅम, गोल १० ग्रॅम आणि चांदी ब्रेसलेट ०६ भार असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. तर एकनाथ खडसे यांच्या बेडरूमतून अंगठ्या ०४ नग एकूण २० ग्रॅम, रोकड ३५ हजार यांच्यासह भेटवस्तू दिलेल्या चांदी गदा ०१ किलो ०१ नग, त्रिशूल चांदी ०१ किलो ०१ नग, चांदी ग्लास ०६ नग एकूण अंदाजे २०० ग्रॅम आणि चांदी तलवार ०१ नग अंदाजे ०२ किलो यांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : Eknath Khadse : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरी जबरी चोरी; सुमारे दहा तोळे सोने आणि रोकड लंपास
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मुक्ताई बंगल्याकडे (Muktai Banglow) धाव घेत पंचनामा आणि तपास करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एका मोठया राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
एकनाथ खडसे घटनेनंतर काय म्हणाले होते?
आमदार खडसे यांनी या घटनेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, घरातून ३५ हजाराची रोकड आणि सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. तसेच खाली आमचे नातेवाईक राहत होते, त्यांचेही पाच तोळे सोने चोरीला गेलेले आहे. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन चोरी केल्याचे दिसून येते. तसेच पोलिसांचा जळगाव जिल्ह्यात धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडा, असे प्रकार सातत्याने होत असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर सडकून टिका केली




