Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेख…राम कृष्ण हरी !

…राम कृष्ण हरी !

संत तुकोबारायांनी अनेक अभंगांतून साधू-संतांची महती वर्णन केली आहे. संतांच्या अंत:करणात रंजल्या-गांजल्यांबद्दल करुणा असावी. त्यांचे अंत:करण लोण्यासारखे अंतर्बाह्य मऊ असावे. मुलाबाळांइतकेच नोकरांवरसुद्धा त्यांचे प्रेम असावे. थोडक्यात संत हा दयेचा सागर असावा.  जसे…

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा॥
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त॥
दया करणे जे पुत्रासी। तेचित दासा आणि दासी॥
तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ती॥

- Advertisement -

संतांची ही थोरवी ऐकून भोळीभाबडी माणसे भारावून जातात. तथापि कीर्तन-प्रवचनातून समाज प्रबोधनाचा वसा घेणार्‍या काही तथाकथित महाराजांनी आजकाल लावलेला बेसूर पाहता अशा बाबा लोकांना झाले तरी काय? असा प्रश्न श्रद्धाळूंना पडल्याशिवाय राहील का? आळंदी हे विश्वकल्याणासाठी पसायदान मागणार्‍या संत ज्ञानदेवांचे समाधीस्थान! मराठी मुलखातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान! अनेक अध्यात्मिक संस्था येथे आहेत. ठिकठिकाणचे विद्यार्थी त्या संस्थांमध्ये अध्यात्मिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र संत ज्ञानदेवांचे नाव धारण करणार्‍या एका संस्थेतील कोणा भगवान महाराजाने एका विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण केल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर झळकली.

वृत्तपत्रांतही छापून आली. हरिपाठ न आल्याने त्या भगवानाने हे अघोरी पाऊल उचलले. जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहे. सध्या तो कोमात गेल्याचे वृत्त आहे. मारकुटा महाराज पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्याच आठवड्यात एका महाराजाने अध्यात्माशी असंबंधित विषय हाताळून तोंड पोळून घेतले. जगाला उपदेश करताना महाराज मंडळी स्वत:च संयम सोडून एखाद्या विद्यार्थ्याला मारहाण किंवा तोंडाळपणाने नको त्या विषयावर अज्ञानाचे प्रदर्शन करीत असतील तर अशा महाराजांचे प्रबोधन सामान्य जनांवर कोणता प्रभाव टाकणार? बहुतेक नेतेमंडळींना एनकेनप्रकारेन प्रसिद्ध पुरुष होण्याचा दुर्धर रोग आढळतो. तोंडात येईल ते बकण्याची सवय त्यांना जडलेली असते.

प्रकरण अंगलट आल्यावर हीच मंडळी विश्वामित्री पवित्रा घेतात. नेते बरळतात म्हणून आता तथाकथित बाबाही बरळू लागले असावेत का? वारकरी कीर्तनकार म्हणवणार्‍यालासुद्धा या रोगाची बाधा व्हावी? कोणी संततीसाठी काय करावे हा उपदेश एखाद्या बाबाने कीर्तनात करावा? जनक्षोभानंतर कीर्तन सोडण्याची धमकी द्यायची ही तर अहंकाराची परमावधीच ना? वारकरी भाविक पायावर डोके ठेवतात याचा इतका परिणाम एखाद्या बाबाच्या डोक्यावर व्हावा? संततीसाठी आंब्याचा महिमा सांगणार्‍या कोणा मनोहराने कीर्तनातील उदाहरणाचे समर्थन करावे; म्हणजे ‘उंदराला मांजर साक्ष’ या म्हणीचे प्रात्यक्षिकच! पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्यात बेताल बडबडणार्‍या व मारकुट्या महाराजांनी भर घालावी हे मराठी माणसाचे दुर्दैव! संत आणि महापुरुषांचा वारसा सांगणार्‍या महाराष्ट्राला अशा बाबांपासून ‘राम कृष्ण हरी’ किंवा ज्ञानोबा-तुकोबा तरी कसे वाचवणार?

- Advertisment -

ताज्या बातम्या