मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आयपीएल 2025 मध्ये एक दिलासा देणारी आणि उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमधून पूर्णपणे सावरत, अखेर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. बुमराहने संघाचा सराव कॅम्प जॉईन केला असून, मुंबई इंडियन्सने याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत केली आहे.
७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार असून, त्याआधी बुमराहचं पुनरागमन संघासाठी नक्कीच मोठी ताकद ठरणार आहे. मात्र, अजूनही तो दुखापतीनंतर पुनरागमनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने, आरसीबीविरुद्ध सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये त्वरित संधी मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
याआधी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या सामन्यात बुमराहच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 देखील गमवावी लागली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे त्याचा रिहॅब झाला आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे.
मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराहचं पुनरागमन म्हणजे गोलंदाजीतील एक महत्त्वाचा आधार पुन्हा मिळाल्यासारखं आहे. आगामी सामन्यांमध्ये बुमराहच्या वेगवान चेंडूंनी पुन्हा एकदा फलंदाजांची परीक्षा पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार, हे नक्की!