मुंबई | Mumbai
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजनांसंबंधीत घोषणा केल्या आहे. त्यातील महायुतीचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला शक्तीपीठ महामार्गावर सध्या सभागृहात चर्चा सुरु आहे. निवडणुकांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारने आता शक्तिपीठ महामार्ग होणारच अशी भूमिका घेतली आहे. मात्र, विरोधकांकडून या महामार्गातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. आमचा विकासकामांना विरोध नाही, पण शक्तिपीठ महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या उपजिविकेचा, शेतीचा प्रश्न, उपस्थित होणार आहे, त्याचे काय, असा सवाल विचारला जात आहे.
हा महामार्ग रद्द करावा यासाठी बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे उपस्थित सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.
सरकार नवे नवे रस्ते करण्यात का इंटरेस्ट घेते हे कळत नाही, मोठे प्रकल्प घ्यायचे त्यातून निधी उपलध करायचा. राजू शेट्टी यांना माहिती आहे की, निवडणुकांमध्ये किती पैसे वाटले जातात, त्यांना चांगला अनुभव आहे, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, विकासासाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जमीन जात असेल त्यांची उपजिवीका दुसरी काही नसेल तर काय. नियमाने इकडे तिकडे असे करू नका, सरकार पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर व्हा. आम्ही भाषण करुन दमलो, कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते. निर्धाराने आलात तर निर्धार टिकला पाहिजे, असे जयंत पाटील यांनी आंदोलकांना उद्देशून म्हटले. दरम्यान, आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नकोत अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचे पाहायला मिळाले.
आपली एकी कायम ठेवा, संघर्ष करायला ठाम रहा, मोजणीला अटकाव ठेवा. आमचा दारुण पराभव झालाय. आम्ही बोलायचं हळूहळू कमी झालोय, कारण बोलून लोकांना काही समजत नाही. दुसरच हिंदुत्व वैगरे समोर असतं, पण तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, राजू शे्ट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असेही जयंत पाटील यांनी म्हटले. यावेळी, शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवं, असे म्हटले.
त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “माझी गॅरंटी घेऊ नका. माझे काय खरे नाही. तुम्हाला माझ्याबद्दल शंका आहे. त्यामुळे तुम्हाला हमी देणे धोक्याचे आहे. शेट्टींना १०० वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभे राहावा. बंटी पाटलांमार्फत ( सतेज पाटील ) शेट्टींना १०० वेळा निरोप दिले होते. निरोप देऊन-देऊन दमलो. म्हणालो, आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे. तुम्ही आमच्याकडून उभे राहावा. टाईम टू टाईम बदलत असतो.”
यावेळी राजू शेट्टींनी म्हटले, “मी खरे बोललो, तर विषय भलतीकडे जाईल.”
जयंत पाटील लागलीच म्हणाले, “तुम्ही खरे बोलला, तर मलाही खरे बोलता येईल. एकाकडेच खरे आहे, असे नाही. राजू शेट्टी खासदार झाले असते, तर लोकसभेत भाषण केले असते. शेट्टी माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा