Thursday, May 2, 2024
Homeनगरनोकरीच्या शिफारशीसाठी धोंडेवाडीच्या तरुणाचे पंतप्रधान मोदींना पत्र

नोकरीच्या शिफारशीसाठी धोंडेवाडीच्या तरुणाचे पंतप्रधान मोदींना पत्र

शिफारशीशिवाय नोकरी मिळत नाही, नोकर्‍यांसाठी भिकार्‍याप्रमाणे कंपन्यांच्या दारावर भटकंती ः अनिल दरेकर

रांजणगाव देशमुख (वार्ताहर) – लहान असतानाच वडिलांची छाया हरपल्यामुळे आईने काबाडकष्ट करून माझे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग तसेच एमटेक पर्यंतचे उच्चशिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा नोकरी शोधण्याची वेळ आली, तेव्हा समजले की शिफारशी शिवाय नोकरी भेटत नाही. अशाच परिस्थितीत मुले नोकरीच्या शोधात प्लेसमेंट कन्सल्टन्सी (झश्ररलशाशपीं उेर्पीीश्रींरपलू) च्या बळी जाऊन हजारो रुपयांना लुटले जातात.

- Advertisement -

पंतप्रधान साहेब, मी एका कॉलेजचा टॉपर मुलगा असतानासुद्धा नोकरीसाठी अडचण येत आहे. माझ्यासारखे विद्यार्थी आज रोजगारासाठी-नोकरीसाठी भिकार्‍याप्रमाणे कंपन्यांच्या दरवाजांवर भटकत आहेत. तसेच एखाद्या जुगार्‍याप्रमाणे भेटला नंबर की कर कॉल, दिसला ई-मेल आय-डी कि कर अर्ज-मेल, अशी भयानक परिस्थिती आज आहे. अशा अशायाचे पत्र कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील युवक अनिल रामदास दरेकर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. त्याच्या प्रती सर्वच आमदार व खासदार यांनाही पाठविल्या आहेत.

त्यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सलग दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. अतिशय लहान खेड्यातील शेतकरी कुटुंबातील मुलगा. तुमच्या सारख्या मोठ्या व्यक्तीसोबत बोलून आपले प्रश्न मांडण्याचा योग येत नाही, त्यामुळे माझ्या भावना या पत्रातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान साहेब, सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे आज देशावरील कर्ज वाढत चालले आहे. ते कर्ज कमी करण्यासाठी आज सरकारने शासकीय कंपन्यांचे खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायजेशन करण्याचा धडाका जोमाने चालवलेला आहे. जर सरकारने शासकीय कंपन्या खाजगी लोकांना विकल्या तर तुम्हीच सांगा रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होणार? सरकारच्या अशा निर्णयामुळे नवीन रोजगार तयार होणार नाहीच, परंतु उपलब्ध असलेला रोजगार पण कमी होत आहे.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक कंपन्या कामावर असलेल्या लोकांची नोकर कपात करत आहेत, अनेक कंपन्या बंद पडत चालल्या आहेत. जीएसटीमुळे कंपनी चालवणे परवडत नसल्यामुळे उद्योजक आत्महत्या करत आहेत, अशी अत्यंत भयानक गोष्ट महाराष्ट्रात घडत आहे. म्हणजेच आज शेतकर्‍यांप्रमाणे उद्योजकांवर सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तशीच वेळ काही दिवसानंतर विद्यार्थी, नोकरदार यांच्यावर सुद्धा येऊ शकते. जर नोकरीला असलेल्या लोकांची नोकरी जात आहेत तर अशा स्थितीत नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या मुलांना कोण नोकरी देणार?

पंतप्रधान साहेब खरं सांगू का, माझ्यासारखे अनेक शेतकर्‍यांची मुले आज जेव्हा डॉक्टर- इंजिनिअर होऊन सुद्धा नोकरी मिळविण्यासाठी वणवण भटकतात, तेव्हा त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल? शेतकरी आईवडील एक वेळेस स्वतःच्या पोटाला अन्न खात नाही, पण आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. अशा वेळी त्या शेतकरी आई-वडिलांनी आणि त्या मुलांनी सुद्धा काय करायचं साहेब?

पंतप्रधान साहेब, मी पण अशाच एका लहान खेड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. माझ्या आईने खूप काबाडकष्ट करून मला शिकवलेले आहे. मला खरच नोकरीची खूप गरज आहे. पंतप्रधान साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर एखाद्या कोणत्या कंपनीमध्ये आपली ओळख असेल तर कृपया मला तुमची शिफारस देऊ शकता का? कारण मला सध्या नोकरीची खूप गरज आहे. तुम्हाला वचन देतो साहेब, मी खुप प्रामाणिकपणे काम करेन. कंपनीची कोणत्याही प्रकारची तक्रार तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. पंतप्रधान साहेब, कृपया मला तुमची शिफारस देऊन सहकार्य करा. मला अपेक्षा आहे, तुम्ही नक्कीच मला मदत कराल. आपल्या उत्तराची अतिशय नम्रपणे एखाद्या चातकाप्रमाणे वाट बघतोय. अशा अशायाचे पत्र दरेकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या