Sunday, April 12, 2026
HomeनगरAhilyanagar : के. के. रेंजमध्ये भारतीय लष्कराचा तंत्रज्ञान व मानवी कौशल्याचा संगम

Ahilyanagar : के. के. रेंजमध्ये भारतीय लष्कराचा तंत्रज्ञान व मानवी कौशल्याचा संगम

सुखोई, हेलिकॉप्टर, रणगाडे, ड्रोनद्वारे अचूकता व संहारक सामर्थ्याचेही दर्शन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भारतीय लष्कराचे रणगाडा दल (आर्मर्ड कोर सेंटर अ‍ॅण्ड स्कूल), यांत्रिकी पायदळ (मेकानाईज इन्फंट्री सेंटर अ‍ॅण्ड स्कूल), वायुदल, टेहळणी व मारक शक्ती म्हणून वापरले जाणारे अत्याधुनिक ड्रोन यांच्या संयुक्त सराव मोहिमेतून अचूक संहारक क्षमतेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शत्रुच्या हालचालींची माहिती मिळवत, व्यूहरचना करून रणगाडे, लढाऊ चिलखती वाहने व त्यावरील जवानांनी कौशल्ये सादर केली. या सराव मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी देशभरासह मित्रराष्ट्रांचे सैन्याधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

नगर शहराजवळील के. के. रेंज (खारेकर्जूने, ता. अहिल्यानगर) येथील सराव क्षेत्रात ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यास निमंत्रित उपस्थित होते. लष्कराच्या या सराव व्यूहरचनेत सुखोई विमाने, हलक्या वजनाची हेलिकॉप्टर, स्वदेशी बनावटीचे स्वान, वज्र व कॉडकॉप्टर आदी ड्रोन, पॅरा स्पेशल फॉर्सेसचे जवान, टेहाळणी करणार्‍या ड्रोनसह अर्जुन व भीष्म (टी-90), अजय (टी-72) हे प्रमुख युद्ध रणगाडे तसेच लढाऊ चिलखती वाहनांचा वापर करण्यात आला. आधुनिक युद्धभूमीवरील तंत्रज्ञान व मानवी कौशल्याचा संगम यामधून सादर करण्यात आला. यामध्ये रणगाडे व लढाऊ चिलखती वाहनांच्या चपळतेला महत्त्व देण्यात आले होते.

भारतीय लष्कराच्या ताफ्यातील प्रमुख रणगाड्यांच्या तोफांनी 800 मीटर ते 5 हजार मीटरपर्यंतचा अचूक मारा करत लक्ष्यवेध केला. यामध्ये क्षेपणास्त्रांचाही वापर करण्यात आला. शहराजवळील के. के. रेंज परिसर भारतीय लष्कराच्या युद्धसराव अभ्यासासाठी राखीव आहे. तंत्रज्ञानाचा विकास होत असल्याने तसेच या सराव क्षेत्रात अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर, पारनेर व राहुरी या तीन तालुक्यातील 23 गावांतील 25610 हेक्टर क्षेत्र पुढील पाच वर्षांसाठी प्रतिबंधित केले आहे. सरावासाठी या परिसरात मनुष्य व पाळीव प्राण्यांनी प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. सरावाचा कालावधी दरवर्षी सुमारे तीन महिन्यांचा असतो.

केवळ जमिनीवरूनच नव्हे तर हवेतही भारतीय लष्कराने आपले वर्चस्व दाखवून दिले. त्यासाठी आधुनिक काळातील युद्धनीतीचा भाग बनलेले स्वार्म ड्रोन व गुप्तचर देखरेख करणार्‍या ‘टोही प्लॅटफॉर्म’ चा प्रभावी वापर सरावात दाखवण्यात आला. आत्मघातकी ड्रोन, हल्ला करून परतणारे ड्रोन, स्फोटके वाहून नेणारे ड्रोन याचाही वापर करण्यात आला. रशिया-युक्रेन युद्ध व तत्पूर्वी इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामध्ये ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करानेही युद्धतंत्रात ड्रोनचा वापर वाढवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याचे उदाहरण ठरले. तसेच भारतीय लष्कराने संरक्षण साहित्यामध्ये खाजगी कंपन्यांना प्रवेशद्वार खुले केले आहे.

या पार्श्वभूमीवर कालच्या या सरावस्थळी खाजगी कंपन्यांनी विकसित केलेले युद्ध साहित्य, उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने ड्रोन कंपन्यांनी सहभाग घेतला. खासगी उत्पादक कंपन्यांनी लष्कराच्या वापरासाठी विकसित केलेले 15 प्रकारचे ड्रोन प्रदर्शनात होते. यातील काही ड्रोन भारतीय संरक्षण विभाग व लष्करी संस्थांनी विकसित केलेले होते. एकूणच लष्कराच्या सरावात ड्रोनचा बोलबाला वाढलेला दिसला.

ताज्या बातम्या

Asha Bhosle Passed Away : आशाताईंच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला...

0
मुंबई | Mumbai ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. काल (शनिवारी) रात्री त्यांना हृदय विकाराचा...