Thursday, May 2, 2024
Homeनगरसहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्राने आयकराचा प्रश्न मार्गी लावावा

सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्राने आयकराचा प्रश्न मार्गी लावावा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कारखान्याला तोटा झाला तरी चालेल, ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे. ही कर्मवीर शंकरराव काळे यांची विचारसरणी होती. ती विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून काळे कारखान्याने उसाला जिल्ह्यात एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेला आहे. ही परंपरा कायम ठेवून तिसरा हप्ता प्रती मे. टन 50 देऊन एकूण दर 2650 व 2010-11 मध्ये कपात केलेली पूर्वहंगामी प्रती. मे.टन 50 रुपये ठेव देखील देऊन शेतकर्‍यांची दिवाळी गोड करणार असल्याचे वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाने आयकराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून सहकारी साखर कारखानदारी वाचवावी, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisement -

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली.

आ. आशुतोष काळे म्हणाले, केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एफआरपी दरापेक्षा ज्यादा दिलेला ऊस दर व बाजारातील साखरेच्या दरापेक्षा सवलतीच्या दरात सभासदांना करण्यात आलेली साखर वाटप याचा आर्थिक फरक कारखान्याच्या उत्पन्नात समाविष्ट करत आयकर आकारणी केलेली आहे. कारखान्याच्या ऊस दराच्या प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात 5 मार्च 2019 रोजी झालेल्या सुनावणीत पुन्हा असेशिंग ऑफिसरमार्फत तपासणी करण्यास सुचविले. त्यानुसार कारखान्यांच्या संबंधित वर्षाची रिअसेसमेंट झाली असून कोणताही बदल न करता पूर्वीप्रमाणेच ऑर्डर केल्यामुळे कारखाने आयकराच्या चक्रव्युहात अडकले आहेत.

मागील तीस वर्षापासून एसएमपी एफआरपीपेक्षा अधिक ऊस दरावरील एकूण रक्कम 9500 कोटीचा आयकर केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना माफ केल्याचे वृत्त वाचून आनंद झाला. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच होती. 2015-16 पासूनच साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र मागील आयकराचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्र शासनाने आयकराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.

जागतिक स्तरावर वाढलेल्या साखरेच्या दराचा पुरेपूर फायदा साखर कारखानदारीने घेतला. यामध्ये काळे कारखान्याने 2 लाख 84 हजार क्विंटल कच्ची साखर निर्यात करून साखर साठा कमी कसा राहील व साखरेच्या मालतारणाच्या कर्जाचे व्याज कमी होऊन कारखान्याचे आर्थिक हित साधले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील गळीत हंगामात विक्रमी ऊस उत्पादन झाल्यामुळे सर्वच कारखान्यांचे ऊस उपलब्धतेचे अंदाज चुकले त्यामुळे गाळप हंगाम लांबला. मागील दोन वर्षापासून चांगले पर्जन्यमान होत असल्यामुळे उसाची वाढ चांगली होऊन 60 ते 70 हजार मे.टन ऊस जास्त उपलब्ध झाला.

213 दिवस चाललेल्या हंगामात ऊस तोडणीच्या अडचणी निर्माण झाल्या असताना ऊस तोडणी मजुरांना ऊस तोडणी अनुदान देऊन जास्तीतजास्त ऊस केन हार्वेस्टरच्या मदतीने जास्तीत जास्त ऊस तोडणी करून नोंदविलेल्या सर्वच उसाचे गाळप केले. यापुढील काळात देखील कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त ऊस केन हार्वेस्टरने तोडण्याचे कारखान्याचे नियोजन आहे. 2021-22 च्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा 3.40 कोटी झाला असून 31 मार्च 2022 अखेर एकूण संचित नफा 21.11 कोटी झाला असून कारखान्यास ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विषय पत्रिकेवरील 1 ते 13 विषय टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले. आभार व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी मानले.

याप्रसंगी व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे, बाळासाहेब कदम, विश्वासराव आहेर, पद्माकांत कुदळे, एम. टी, रोहमारे, चंद्रशेखर कुलकर्णी, कारभारी आगवण, काकासाहेब जावळे, वसंतराव दंडवते,आनंदराव चव्हाण, संभाजी काळे, नारायण मांजरे, धरमचंद बागरेचा, गोरक्षनाथ जामदार, अ‍ॅड. आर. टी. भवर, अ‍ॅड. एस. डी. औताडे आदींसह सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या