अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्नाटक राज्यातून दिल्लीकडे अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचा संशय असलेल्या सुमारे 61 लाख 75 हजार रूपये किमतीच्या लाल सुपारीच्या सुमारे 800 गोण्या अहिल्यानगर शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात दोन ट्रक ताब्यात घेण्यात आले असून, अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. संबंधित माल करचुकवेगिरीने आणला गेला आहे का किंवा त्यामध्ये प्रतिबंधित पदार्थांची भेसळ आहे का, याचा तपास वस्तू व सेवा कर विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत केला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून निघालेल्या दोन ट्रकांमधून लाल सुपारीची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. ही वाहतूक अहिल्यानगर मार्गे दिल्लीकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांना कारवाईचे निर्देश दिले. डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी (7 मे) सकाळी सापळा रचण्यात आला. संशयित दोन ट्रक आढळताच पोलिसांनी त्यांना थांबवून ताब्यात घेतले.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत एका ट्रकमध्ये सुमारे 450 गोण्या तर दुसर्या ट्रकमध्ये सुमारे 350 गोण्या लाल सुपारी आढळून आल्या. या सुपारीची एकूण किंमत सुमारे 61 लाख 75 हजार रूपये असल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेली सुपारी सडलेल्या अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले आहे. दोन्ही ट्रक पोलिसांनी जप्त करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले आहेत. सध्या या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, वस्तू व सेवा कर विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्र देण्यात आले आहे. संबंधित विभागांकडून तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांनी सांगितले.





