पिंपळदर | वार्ताहर
येथील पिंपळदर रस्त्यालगत असलेल्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागून डाळींब बाग भस्मसात झाली. यात मोठ्या प्रमाणात झाडे जळाल्याने लाखो रूपयांची वित्तहानी झाली. रविवारी दुपारी हा अग्निप्रकोप झाला.
पिंपळदर शिवारातील राजेंद्र यादव ठोके यांच्या शेतातून जाणाऱ्या वीजवाहिनीच्या तारांमध्ये घर्षण झाल्याने शॉर्टसर्किट होवून ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे त्यांच्या डाळींब बागातील गवताने पेट घेतला. वाळलेले गवत व बागेत असलेल्या ठिबक सिंचन नळ्यांनी ही आग भडकली. त्यात ठोके यांच्या डाळींब बागेतील शंभराहून अधिक झाडे जळून खाक झाली. तर उर्वरित झाडे आगीच्या ज्वालांनी होरपळली आहेत.
ऐन लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्याची ठिणगी पडल्याने पेपर मिलला आग; कच्चा माल जळून खाक
आगीची घटना लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी धावपळ करत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. लगतच्या शेतकऱ्यांनी वेळीच मदत केल्याने आग रोखण्यात यश आले. अन्यथा संपूर्ण डाळिंब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. तसेच संबंधित शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
आधीच दुष्काळी परिस्थिती, वाढता शेतीचा खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शॉर्टसर्किटमुळे झालेल्या या नुकसानीने ठोके यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.




