कर्नाटक । Karnatak
कर्नाटकातील पोलीस दलातील एका अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक (डीजीपी) डॉ. रामचंद्रराव हे या आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात असून, या गंभीर प्रकरणामुळे आयपीएस (IPS) वर्तुळाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची दखल घेत राज्य सरकारने तातडीने कारवाई करत डॉ. रामचंद्रराव यांना २० जानेवारी २०२६ रोजी पदावरून निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला हा व्हिडिओ डीजीपी कार्यालयातच गुप्त कॅमेऱ्याद्वारे चित्रीत झाल्याचा प्राथमिक संशय आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. रामचंद्रराव हे पोलीस गणवेशात असताना त्यांच्या कार्यालयात आलेल्या काही महिलांसोबत अनुचित वर्तन करताना दिसत आहेत. कार्यालयीन वेळेत आणि कर्तव्यावर असताना महिलांना मिठी मारणे व त्यांचे चुंबन घेणे यांसारखे प्रकार या कथित व्हिडिओत दिसत असल्याचा आरोप आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर आणि विश्वासार्हतेवर सर्वसामान्य जनतेतून कडक टीका केली जात आहे.
या प्रकरणाचे पडसाद उमटताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “डीजीपी रामचंद्रराव यांच्या कथित व्हिडिओची माहिती सरकारला मिळाली असून, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कोणताही शासकीय अधिकारी कायद्यापेक्षा मोठा नसतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कोणतीही तडजोड न करता कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपली नाराजी व्यक्त करत शिस्तीच्या बाबतीत शून्य सहिष्णुता (Zero Tolerance) पाळण्याचे संकेत दिले आहेत.
संबंधित व्हिडिओमध्ये कोणत्याही महिलेवर जबरदस्ती झाल्याचा थेट आरोप अद्याप झालेला नसला, तरी एका वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने सार्वजनिक कार्यालयात अशा प्रकारचे वर्तन करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जात आहे. या प्रकरणातील तांत्रिक सत्यता तपासण्यासाठी हा व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. दरम्यान, १९ जानेवारीच्या रात्री उशिरा राज्य सरकारने निलंबनाचे आदेश जारी केले असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. रामचंद्रराव यांना कर्तव्यापासून दूर ठेवण्यात आले आहे.
बड्या अधिकाऱ्यांचे ‘हनी ट्रॅप’ प्रकरण आधीच चर्चेत असताना आता थेट डीजीपी दर्जाचा अधिकारी अशा वादात अडकल्याने कर्नाटक पोलीस दलाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणामागे नेमके काय गौडबंगाल आहे आणि हा व्हिडिओ कोणी व का व्हायरल केला, याचा तपास आता सीआयडी (CID) किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




