मुंबई | Mumbai
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले. राजघाटावर राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केले. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी यांनीही एक पोस्ट महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. पण यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा सांधला आहे. “गांधीजींनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवले. प्रश्न विचाराने सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. आंदोलने आणि आंदोलकांकडे संशयाने पाहिले जाते. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्तीत होत आहेत. सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचे सामर्थ्यगी गांधींनी दिले. पण, सत्ताधाऱ्यांना गांधीजी फक्त श्रद्धांजलीपुरते हवे असतात,” असे म्हणत टोला लगावला.
राज ठाकरे नेमंक काय म्हणाले?
आज महात्मा गांधीजींची जयंती. खरंतर कुठल्याही महापुरुषाची आठवण फक्त त्याच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला काढायची, त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करायचा आणि फोटो काढायचे इतक्या पुरतेच आपल्याला महापुरुष आठवतात. स्मारकं म्हणजे पुतळे ही आपली आवडती व्याख्या आणि आता पुतळ्यांच्या सोबत फोटो ही आपली नवीन श्रद्धांजली. असो.
पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात गांधीजींची आठवण खरंतर अधिक प्रकर्षाने यायला हवी. कारण त्यांनी सत्तेला प्रश्न विचारायला शिकवलं… आणि प्रश्न विचारणं हे सद्य सत्ताधाऱ्यांना आवडत नाही. प्रश्न विचारले की, ते आणि त्यांच्या समर्थकांच्या ‘ ट्रोळ्या ‘ तुम्हाला देशद्रोही ठरवायला आतुरच असतात.
आज आंदोलनांकडे संशयाने पाहिलं जातं, आंदोलकांवर बळाचा वापर होतो आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी गांधीजींची सर्वाधिक गरज आहे.
गांधीजींनी या देशाला दिलेली सर्वात मोठी गोष्ट कोणती?
मला वाटतं—सत्तेला ‘नाही’ म्हणण्याचं सामान्य माणसाचं सामर्थ्य!
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, सोयीने कायदा बदलण्याची शक्यता असते आणि या कायद्याच्या आधारावर गुन्हेगार ठरवण्याची शक्ती ते स्वतःकडे अबाधित ठेवतात. पण एवढं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर, त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते हे गांधीजींनी दाखवून दिलं. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीजच्या काळात या क्षमतेवरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सर्वानी सावध राहायला हवं..
स्फोटक साठा प्रकरण: होलसेलरची एटीएसकडून चौकशी; एक्सपायर्ड अन् दुसऱ्याच्या नावावरील परवान्यावर खरेदी
लोकशाहीत जनता सार्वभौम असते याची सत्ताधाऱ्यांना अधूनमधून आठवण करून दिली पाहिजे. राजकीय पक्षांची आंदोलनं, मोर्चे आणि त्यातला जनसहभाग हे सर्व सत्ताधाऱ्यांना जाणीव करून देण्याचा मार्ग आहे हे विसरू नये. आणि हेच गांधीजींच्या शिकवणीचं सार आहे.
म्हणून गांधीजी सत्ताधाऱ्यांना फक्त श्रद्धांजली पुरते हवे आहेत बाकीचे गांधीजी त्यांच्या सोयीचे नाहीत. पण लोकशाहीला गांधीजी कायम आवश्यक असतात हे आपण विसरता कामा नये.
महात्मा गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन!




