पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
श्रीक्षेत्र मढी येथे फुलोरबाग यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो कावडीच्या पवीत्र जलाने चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीस जलाभिषेक करण्यात आला. कानिफनाथांची निशाण भेट शांततेत होऊन कावड मिरवणूक उत्साहात संपन्न झाली.
निशाण भेटीच्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली .निशाण भेटीदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. फुलोरबाग यात्रेचा शेवटचा टप्पा मढी निवंडुगे गावाच्या हद्दीत साजरा होतो. मढी येथे समाधी सोहळ्यास येण्यापूर्वी चैतन्य कानिफनाथ विश्रांतीसाठी जेथे थांबले त्या जागेवर फुलोरबाग यात्रा भरते. अनेकजण नवसाचीपूर्ती करण्यासाठी फुलोरबाग यात्रेस आवर्जून हजेरी लावतात.
पैठण शेवगाव आमरापूर साकेगाव हत्राळ या मार्गी सुमारे 60 किलोमीटरची पायपीट करत निवडुंगे गावी व मढी येथे सोमवारी सांयकाळी फुलोरबागेत कावड भाविक दाखल झाले. निवडुंगे – मढी तिसगाव – मढी मायंबा – मढी रस्तावर वाहानाची कोंडी झाली होती. मढीकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले होते. दुपारी तीन वाचण्याच्या सुमारास वाजत गाजत मानाचे निशाण कावडीची मिरवणूक फुलोरबागेतून कानिफनाथ मंदिराकडे निघाली. मढी पैठण, कासार पिंपळगाव, माळीबाभुळगाव, सुसरे या गावातील निशाण मिरवणुकीत अग्रभागी होते. निशाणभेटीसाठी कानिफनाथांची पालखी गडावरून निघाली.
विविध गावचे कावडींचे जलाभिषेक लगेचच सुरू झाले. सायंकाळी 5.30 वाजता गडावरून आलेली नाथांची पालखी व फुलोरबाग येथून आलेल्या मानाच्या पाच कावडींची निशाणाची भेट गावकुसाला लक्ष्मीआई मंदिराजवळ पोलीस बंदोबस्तात संपन्न झाली. गंगामाई की जय, हरहर महादेव, चैतन्य कानिफनाथ महाराज की जय अशा घोषणांनी परीसर दुमदुमला. नाथांचे परतीचे पालखी मिरवणुकीत सुवासिनींनी ओवाळणी केली. फेर धरीत नृत्य केले. लहान मुलांना कावडीसमोर झोपविण्याची नवसपूर्ती केली.
यात्रेत आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती निशाण भेट सोहळ्यानंतर अनेक गावांच्या भाविकांनी माहाप्रसादाचे वाटप केले. देवस्थान समितीने कावड यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याने यंदा वाद झाले नाहीत. स्थानीक कावडीवाल्यासाठी स्वतंत्र रांग तर ईतर भाविकासाठी दर्शनबारीतून सुवीधा करण्यात आली विश्वस्त मंडळ सर्व कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.
देवस्थान अध्यक्ष बबन मरकड, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, विश्वस्त रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड, डॉ. विलास मढीकर, नवनाथ मरकड, डॉ .रमांकात मडकर, पोलीस निरीक्षक संतोष मुटुकुळे, भाग्येश मरकड, अशोक मरकड, बाळासाहेब मरकड, ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांच्यासह मढी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.