नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थान व प्रसादा लाडू चर्चेचा विषय ठरले आहेत. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये जनावरांची चरबी आढळल्याचा खळबळजनक आरोप झाल्यानंतर त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेले असून कोर्टात यासंदर्भात सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.
तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर ४ याचिकांवर सुनावणी झाली. लाडूंची कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी याचिकांमध्ये करण्यात आली. याचिकाकर्त्यांमध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी, वाय.व्ही. सुब्बा रेड्डी, विक्रम संपत आणि दुष्यंत श्रीधर. सुरेश चव्हाणके यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सोनिया माथूर यांनी युक्तिवाद केला. सिद्धार्थ लुथरा आणि मुकुल रोहतगी हे आंध्र प्रदेश सरकारचे वकिल आहेत. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते.
तिरुपती देवस्थानाच्या प्रसादासंदर्भात चालू असणारा वाद राजकीय मुद्दा होऊ लागला आहे. आधी विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीच आधीच्या सरकारच्या काळात प्रसादाच्या लाडूंसाठी भेसळयुक्त तूप वापरले जात होते असा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर वायएसआरसीपी अर्थात आंध्र प्रदेशातील आधीच्या सत्ताधारी पक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आले. त्यावरून आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झाले आहे.
काय म्हंटले न्यायालयाने?
सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनवाणी सुरु असून, कोर्टाने फटकारले आहे. किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा अशा कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तुपामध्ये फिश ऑईल, बीफ टॉलो आणि लार्ड (डुकराची चरबी) आढळल्याचा दावा करणारा प्रयोगशाळेचा अहवाल जारी केल्याच्या वेळेचीही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली. “आम्ही देवाला राजकारणापासून दूर ठेवले जाईल अशी अपेक्षा ठेवतो. मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांकडे का गेले?,” अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली. तसेच, “हा श्रद्धेचा विषय आहे. जर भेसळयुक्त तूप वापरले गेले असेल, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाही”, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर केला.
तुषार मेहता यांच्या युक्तिवादावर न्यायमूर्तींनी यासंदर्भातल्या पुराव्याची मागणी केली. “प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी भेसळयुक्त तूप वापरले गेले होते, याचा काय पुरावा आहे?” अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.
कोर्टात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून लावण्यात आलेल्या आरोपांची कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांचा दावा आहे की, तिरुपती मंदिरातील प्रसादात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाचे तेल वापरण्यात आले आहे. यादरम्यान राज्य सरकारची एक समिती प्रसादाची गुणवत्ता आणि लाडूत वापरण्यात आलेल्या तुपाचा तपास करण्यासाठी मंदिरात आहे.
दरम्यान, यावेळी न्यायालयाने माध्यमांमध्ये या मुद्द्यावरून चालू असणाऱ्या चर्चेवरून पक्षांना सुनावलं आहे. “जर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते, तर मग यासंदर्भात माध्यमांकडे जाण्याच काय आवश्यकता होती?” अशी विचारणा न्यायालयाने केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा