Thursday, May 7, 2026
HomeराजकीयKerala Election Results : केरळमध्ये काँग्रेसचा 'हात' बळकट! सुरुवातीच्या कलानुसार यूडीएफची बहुमताकडे...

Kerala Election Results : केरळमध्ये काँग्रेसचा ‘हात’ बळकट! सुरुवातीच्या कलानुसार यूडीएफची बहुमताकडे वाटचाल, विजयन यांची सत्ता जाण्याची चिन्हं

थिरुवनंतपुरम । Thiruananthapuram

निसर्गसंपन्न केरळ राज्याच्या राजकीय क्षितिजावर आज परिवर्तनाचे वारे वाहताना दिसत आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील ‘एलडीएफ’ (LDF) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन इतिहास रचणार की केरळची ‘आलटून-पालटून’ सत्ता देण्याची चार दशकांची परंपरा कायम राहणार, या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही तासांतच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूडीएफ’ने (UDF) मोठी मुसंडी मारत डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे.

- Advertisement -

केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांसाठी आज, सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. सकाळी १० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, १४० पैकी ८० जागांचे चित्र समोर आले आहे. यामध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफ ४५ जागांवर आघाडीवर असून, सत्ताधारी एलडीएफला केवळ २५ जागांवर समाधान मानावे लागत आहे. भाजपने (NDA) ४ जागांवर आघाडी घेत आपले अस्तित्व ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे, तर इतर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

आजचा निकाल केवळ केरळपुरता मर्यादित नसून तो राष्ट्रीय राजकारणाची दिशा ठरवणारा आहे. जर केरळमध्ये डाव्यांचा पराभव झाला, तर १९७७ नंतर पहिल्यांदाच देशातील एकाही राज्यात डाव्यांची सत्ता नसेल. त्यामुळे हा पराभव डाव्या विचारसरणीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. विविध वृत्तवाहिन्यांनी यूडीएफला ८२ ते ९४ जागा मिळतील, असा जो अंदाज वर्तवला होता, त्याच दिशेने सध्याची आकडेवारी सरकताना दिसत आहे.

९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात केरळच्या जनतेने ७८.२७% इतके भरघोस मतदान केले होते. वाढलेला हा मतदानाचा टक्का सत्ताधाऱ्यांविरोधात गेल्याची शक्यता सध्याच्या कलांवरून वर्तवली जात आहे. भाजपनेही आपली पूर्ण ताकद लावली असून, त्यांना १ ते ३ जागा मिळण्याची शक्यता असली तरी सध्या ते ४ जागांवर आघाडीवर आहेत, हे विशेष. दुपारी १२ वाजेपर्यंत केरळचा ‘नवा नवाब’ कोण हे अधिकृतपणे स्पष्ट होईल. सध्या तरी तिरुवनंतपुरमच्या रस्त्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली असून ‘हात’ पुन्हा एकदा सत्तेच्या दिशेने झेपावताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

Crime News : दोन महिलांना देवळाली प्रवरेत मारहाण; गुन्हा दाखल

0
राहुरी |वार्ताहर| Rahuri मावशीला त्रास देवु नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी तरुणीला शिवीगाळ करुन गाडीचा पान्हा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी...