दिल्ली । Delhi
योग गुरु म्हणून बाबा रामदेव हे संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर अनेकदा ते त्यांच्या पतंजली कंपनीवरील वाढत्या वादामुळे देखील चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा बाबा रामदेव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
केरळ न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. बाबा रामदेव यांच्याबरोबरच पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या पतंजलीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
केरळच्या पलक्कड जिल्हा न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या अनुपस्थितीमुळे हे वॉरंट जारी केले आहे. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात ते दोघेही सुनावणीवेळी हजर राहिले नाहीत.
केरळ न्यायालयाने दोघांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे या दोघांनाही येत्या १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल.
यापूर्वी, १ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते जेणेकरून ते न्यायालयाचा मान राखून कोर्टात हजर राहतील. मात्र बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.