अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
खरीप हंगाम 2026 मध्ये ट्रिगर-1 लागू झालेल्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत प्राप्त झालेल्या अधिकृत स्थिती अहवालानुसार, जिल्ह्यातील 1 हजार 610 गावांपैकी सर्व 1610 गावांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पोहचली असून, प्रागतिक पातळीवर सुमारे 72.88 टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
नगर जिल्ह्यात खरिप पिकांखालील एकूण पेरणी/लागवड क्षेत्र 11 लाख 11 हजार 206 हेक्टर असून, एकूण 10 लाख 23 हजार 901 खातेदार शेतकरी नोंदणीकृत आहेत. यात जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांतील 100 टक्के गावांमध्ये (1 हजार 610 गावे) पंचनाम्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यातील 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 7 लाख 46 हजार 240.8 हेक्टर क्षेत्राचे (72.88 टक्के) पंचनामे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, दुष्काळामुळे नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर-1 लागू झालेला आहे. या ठिकाणी आता पहिल्या टप्प्यात खरिप हंगाम पेरणी होवून जळालेल्या पिकांचा पंचनामा करण्यात येत आहे. हा पंचनामा गाव पातळीवर असणारी ग्रामस्तरीय समिती करत असून या समितीत कृषी साहयक आणि तलाठी यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय पंचनामा स्थिती
संगमनेर तालुका: पंचनामा पूर्ण करण्यात संगमनेर तालुका आघाडीवर असून येथे 86.60 टक्के खातेदारांचे (85 हजार 325 हेक्टर क्षेत्र) काम पूर्ण झाले आहे. पारनेर तालुक्यात 85.78 टक्के खातेदारांचे (81 हजार 333.8 हेक्टर क्षेत्र) पंचनामे पूर्ण झाले आहेत. नगर तालुक्यात 82.75 टक्के खातेदार आणि 87.01 टक्के क्षेत्राचे (71 हजार 299 हेक्टर) पंचनामे पूर्ण झाले आहेत. राहुरी तालुक्यात 86.37 टक्के क्षेत्र तर राहाता तालुक्यात 87.40 टक्के क्षेत्राचे काम पूर्ण झाले आहे. अकोले तालुक्यातील 100 टक्के गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून तेथे 68.23 टक्के क्षेत्राचे काम पूर्ण झाले आहे. अन्य तालुक्यात श्रीगोंदा (72.50 टक्के), कर्जत (75.14 टक्के), नेवासा (68.84 टक्के), श्रीरामपूर (70.73 टक्के), कोपरगाव (65.83 टक्के), पाथर्डी (64.65 टक्के), शेवगाव (57.51 टक्के) आणि जामखेड (54.54 टक्के) या तालुक्यांमध्ये देखील पंचनाम्याचे काम प्रगतीपथावर आहे.
पंचनाम्यावर अवलंबून राहणार भरपाई
जिल्हा प्रशासनाकडून उर्वरित शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून बाधित शेतकर्यांना वेळेत आर्थिक मदत व विमा भरपाई मिळण्यास मदत होईल. दरम्यान, होणार्या पंचनाम्यावर संबंधीत शेतकर्यांच्या सरकारकडून देण्यात येणार्या भरपाईचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.




