Monday, May 6, 2024
Homeनगरखोकर सोसायटी निवडणुकीत 13 जागांसाठी 75 अर्ज दाखल

खोकर सोसायटी निवडणुकीत 13 जागांसाठी 75 अर्ज दाखल

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यात प्रतिष्ठेच्या असलेल्या खोकर विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ निवडणुकीत 13 जागांसाठी 75 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथे यावर्षी तिरंगी लढत होणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. सत्ताधारी अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, संचालक ज्ञानेश्वर काळे व विरोधी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पटारे अशी तिरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत दि. 18 एप्रिल असल्याने त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल, दि. 28 एप्रिल रोजी मतदान होत आहे.

- Advertisement -

खोकर विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीसाठी सर्वसाधारण कर्जदार मतदार संघात आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक, महिला मतदार संघातून दोन, इतर मागास वर्गीय व भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गातून प्रत्येकी एक असे तेरा संचालक निवडायचे आहे. यासाठी 919 पैकी 689 सभासद मतदानास पात्र आहेत. दाखल झालेल्या सर्व 75 उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याने निवडणुकीत चुरस होणार हे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण कर्जदार मतदार संघात 43, अनुचीत जाती/जमाती प्रवर्गातून पाच, महिला मतदार संघात 12, इतर मागास प्रवर्गात आठ तर भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गात सात उमेदवारांचे अर्ज दाखल आहेत. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदिपकुमार रूद्राक्ष काम पाहत असून त्यांना सोसायटीचे सचीव कृष्णा शिंदे व भाऊसाहेब चव्हाण सहकार्य करत आहेत.

खोकर सोसायटी गेल्या अनेक वर्षापासून माजी आ. भानुदास मुरकूटे यांचे नेतृत्वाखाली पोपटराव जाधव गटाचे ताब्यात आहे. परंतू नुकत्याच झालेल्या अशोक कारखाना निवडणुकीत जाधव यांच्याऐवजी अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे यांचे चिरंजीव व युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर काळे यांना उमेदवारी मिळाली आणी येथील राजकीय गणितं बदलली. माजी आ. मुरकूटे यांनी काळे यांचेकडे सोसायटी निवडणुकीची धुरा दिली असल्याचे दिसत आहे.

अशोकचे माजी उपाध्यक्ष पोपटराव जाधव सत्ताधारी आहेत. गेल्या अनेक पंचवार्षीकपासून सोसायटी निवडणुकीत मुरकूटे गटातील हे मातब्बर गावपातळीवर एकमेकांचे विरोधक असल्याचे सर्वश्रूत असल्याने आम्ही कारखान्यात असल्याने ही आमची नैतीक जबाबदारी असल्याचे बाबासाहेब काळे यांनी सांगितले आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुरकूटे-ससाणे युती असली तरी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव यांना बरोबर घेवून ग्रामपंचायत काबीज केली आहे.

आमचे ग्रामपंचायत निवडणुकीचे माध्यमातून मनोमिलन झालेले असल्याने आम्ही जाधव यांचे बरोबर राहणार असल्याचे ससाणे गटाने जाहीर केले आहे. आ. लहु कानडे गटाने येथे सध्या अलीप्त भुमिका घेतली असली तरी शेवटच्या चरणात या गटाची भुमिका ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत येथे मुरकूटे गटात फुट पडलेली दिसत असून या विभाजनाचा फायदा घेत भाजपाचे सदाशिव पटारे यांनीही कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या