छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar
पत्नी अंजुम खलील शेख हिच्या डोक्यात पाटा घालून तिचा निर्घृण खून करणारा पती महंमद खलील महंमद इस्माईल ऊर्फ शेख खलील याला त्याच्या मुलाच्या साक्षीवरून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.पी. इंगळे यांनी जन्मठेप ठोठावली.
अंजुम हिचा भाऊ रहीम करीम शेख याने फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार अंजुमचा खलीलशी २००९ साली विवाह झाला होता. त्यांना नऊ आणि सात वर्षांची दोन मुले आहेत. अंजुम ही इंदिरानगरातच रहायची. खलीलचे याआधीही एक लग्न झालेले आहे. २७ मार्च २०२२ रोजी खलील अंजुमकडे आला. घर खाली करण्याच्या कारणावरून अंजुम व खलील यांच्यात वाद झाला. खलीलने रागाच्या भरात घराबाहेरून पाटा उचलून आणला आणि मुलाच्या डोळ्यादेखत त्याने तो अंजुमच्या डोक्यात घातला. तेव्हा मुलाने मावशीला फोन केला व मामाला लवकर पाठव, असे सांगितले. अंजुमला घाटीत दाखल करण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला.
जिन्सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर. के. मयेकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात मुलगा, मावशी आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक बी. बी. कोलते यांनी काम पाहिले.