अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर- पुणे महामार्गावर शनिवारी (16 ऑगस्ट) पहाटे दोन चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची घटना घडली. या घटनेत रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख 76 हजार 50 रूपयांचा ऐवज लुटला गेला असून, अहिल्यानगर तालुका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
रामदास गोविंदराव पवार (वय 54, रा. देवठाणाखाम, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी फिर्याद दिली आहे. रामदास पवार हे आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसोबत पुण्याकडे जात होते. रात्री दोन वाजता कृष्णाई हॉटेल, चास (ता. अहिल्यानगर) शिवारात त्यांना लुटण्यात आले. तसेच त्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील अरणगाव ब्रिज परिसरात दोघांनी इतर काही प्रवाशांच्या वाहनांना अडवले. कोयता व चाकू दाखवत त्यांनी प्रवाशांकडील रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले.
फिर्यादी पवार यांच्यासह इंद्रजित घुगे, आकाश चंदनशिव, आरती शिंदे यांच्याकडील 10 हजार 50 रूपयांची रोख रक्कम, उषाबाई पवार, आरती शिंदे, सरला पवार, पायल जाधव, मालाबाई राठोड यांच्याकडील सुमारे चार तोळ्याचे दागिने व मालाबाई राठोड यांच्याकडील 80 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकुण 1 लाख 76 हजार 50 रूपयांचा ऐवज लुटला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक प्रल्हाद पतंगे व ई. बी. आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
गस्त वाढविण्याची मागणी
अहिल्यानगर- पुणे महामार्गावरून प्रवास करताना चास शिवारात प्रवाशांना अडवून लुटले जाते. याठिकाणी वारंवार घटना घडत असून अहिल्यानगर तालुका पोलिसांनी रात्रीच्यावेळी सदर ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लुटीच्या घटना थांबायला तयार नाही. दुसरीकडे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना देखील या गुन्ह्यातील संशयित आरोपी मिळत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांनी रात्रीच्यावेळी प्रवास करताना अंधारात थांबू नये, सुरक्षीत ठिकाणी थांबावे, प्रवासात काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





