Thursday, April 9, 2026
HomeराजकीयKolhapur Municipal Election : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज...

Kolhapur Municipal Election : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य

मुंबई । Mumbai

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, येथील राजकीय वातावरण आता महापौर निवडीच्या वळणावर येऊन ठेपले आहे. ८१ जागांच्या या महापालिकेत सत्तेसाठी ४१ या जादूई आकड्याची गरज असताना, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा स्थितीत फोडाफोडीचे राजकारण आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला असून, कोल्हापूरचे राजकारण सध्या ‘बॅकडोअर’ चर्चेने तापले आहे.

- Advertisement -

निकालाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस हा ३४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठी त्यांना अजून ७ जागांची आवश्यकता आहे. दुसरीकडे, महायुतीने एकत्रितपणे ४५ जागांचा टप्पा गाठला आहे, ज्यामध्ये भाजप २६, शिवसेना (शिंदे गट) १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४ जागांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडे काँग्रेसच्या ३४ आणि शिवसेना (ठाकरे गट) १ अशा एकूण ३५ जागा आहेत. जनसुराज्य पक्षाचा १ नगरसेवक निवडून आला असून तो महायुतीसोबत असल्याचे मानले जाते.

या सर्व घडामोडींत शिवसेना (शिंदे गट) सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र अवघ्या काही जागांनी सत्ता त्यांच्या हातांतून निसटली आहे. आता ही सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून शिंदे गटाला आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जर शिंदे गटाच्या नगरसेवकांनी काँग्रेसला साथ दिली, तर कोल्हापूरचे सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलू शकते.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांना काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील यांनी, “या सर्व बॅकडोअर चर्चा आहेत आणि अशा चर्चा जाहीरपणे सांगता येत नाहीत,” असे विधान केले. त्यांच्या या सूचक विधानामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सस्पेन्स वाढला आहे. पडद्यामागे नक्कीच काहीतरी शिजत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

सध्या निवडून आलेल्या नगरसेवकांना फुटण्यापासून वाचवण्यासाठी विविध पक्षांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर येत आहे. महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असताना, २०१9 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जसे अनपेक्षित समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळाले होते, तसाच काहीसा ‘चमत्कार’ कोल्हापुरात होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत सत्तेसाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून, शिंदे गटाची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...