कोल्हार |वार्ताहर| Kolhar
कोल्हार भगवतीपूर येथे भर रस्त्यावर, दिवसाढवळ्या 81 वर्षांच्या वयोवृद्धास लुटल्याची घटना घडली. राधुजी हरी बांगरे हे कोल्हार-लोणी रस्त्याने घरी चालले असताना, त्यांना स्विफ्ट कारमधून आलेल्या अज्ञात दोघांनी अडविले. त्यांच्याकडील सोन्याच्या दोन अंगठ्या व गळ्यातील लॉकेट असे 4 तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून ते पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने अकार्यक्षम पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत.
राधुजी बांगरे हे शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे यांचे वडील आहेत. मंगळवारी सकाळी ते भगवतीमातेचे दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी स्कुटीवर निघाले.
कोल्हार-लोणी रस्त्यावर बांगरे वस्ती कमानीजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारमधील दोघांनी त्यांना अडविले. त्यांना जवळ बोलावले व गाडीत बसूनच त्यांनी श्री. बांगरे यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट आणि हातातील दोन अंगठ्या ओरबाडून घेतल्या व लोणीच्या दिशेने पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राधुजी बांगरे हे थोडावेळ हादरले. अशाही अवस्थेत प्रसंगावधान राखत त्यांनी स्विफ्ट कारचा लोणी पोलीस स्टेशनपर्यंत पाठलाग केला. परंतु चोरटे सापडले नाहीत. अंदाजे साडेतीन ते पावणेचार लाख रुपयांचे चार तोळे सोन्याच्या दागिन्यांवर या अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. विशेष बाब म्हणजे दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास भर रस्त्यावर ही घटना घडली. या संदर्भात लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
कोल्हार-लोणी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्यामधील फुटेज पाहिल्यावर श्री. बांगरे यांना भगवतीपूर येथील काळा मळ्याजवळ पाहिल्यानंतर ही स्विफ्ट कार यू-टर्न घेऊन त्यांच्या मागे आल्याचे आढळून आले. तेथून त्यांनी बांगरे यांचा पाठलाग करून ऐवज लुटला. भरदुपारी घडलेल्या या प्रकरणामुळे लोणी पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कोल्हार-भगवतीपूर परिसरात घडलेल्या चोर्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. दमबाजी, भांडणे, मारामार्यासारख्या घटना येथे सर्रास घडतात.
मात्र त्यावर पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अवैध धंद्यांना पूर्ण संरक्षण दिले जाते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सन्मान आणि सर्वसामान्य जनतेची हेटाळणी केली जात असल्याचे येथील नागरिक प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतात. डाळींब चोरांचा येथे सुळसाळाट झाला आहे. पोलिसांच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कार्यपद्धतीबद्दल कोल्हार-भगवतीपूर येथील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली आहे.
दीड महिन्यापूर्वी, अर्थात 24 मे 2025 रोजी, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे सचिव संपतराव विठ्ठल कापसे यांच्या वस्तीवर धाडसी चोरी झाली होती. यामध्ये 12 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप त्याचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यानंतरही गावात छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या. त्याचाही तपास नाही. एक प्रकारे सावळा-गोंधळ सुरू असून लोणी पोलिस ठाण्याच्या पोलिसांचा गलथान कारभाराचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे.




