Friday, September 20, 2024
Homeनगरकोल्हार खुर्दचे तलाठी वाळू तस्करी का रोखत नाही?

कोल्हार खुर्दचे तलाठी वाळू तस्करी का रोखत नाही?

ग्रामस्थांचा सवाल || कार्यालयाला टाळे ठोकणार

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे बोकाळलेली वाळूतस्करी गंभीर मुद्दा बनली आहे. राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची इत्यंभूत माहिती असतानाही येथील कामगार तलाठी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. याबद्दल नागरिकांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला असून लवकरच येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.

कोल्हार खुर्द येथील प्रवरा नदीपत्रातून खुलेआम दिवसरात्र बेकायदा वाळू तस्करी सुरू आहे. कोल्हार खुर्दचे तलाठी, सर्कल, राहुरीचे तहसीलदार, पोलीस या सर्वांना याबद्दल संपूर्ण माहिती आहे. मग शासनाचा प्रचंड महसूल बुडवून विनापरवाना सुरू असलेला हा वाळू उपसा कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे. कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत. कोणाची मिलीभगत आहे? कोणकोणाचे हात यात बरबटलेले आहेत? असे अनेक प्रश्न संतप्त ग्रामस्थ विचारू लागले आहेत.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी रास्त मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात येथील काही स्थानिक पुढारी महसूलमंत्र्यांना भेटून सविस्तर कल्पना देणार असल्याचे सांगण्यात आले.

येथील नदीपात्रातून दिवसरात्र वाळू ओरबाडली जात आहे. नदीकाठच्या शेतकर्‍यांचे कधीही भरून न येणारे नुकसान यातून होत आहे. शिवाय बळावलेल्या वाळू तस्करीमुळे गावातील वातावरण बिघडत चालले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. कोल्हार खुर्दच्या तलाठ्यांना यासंबंधी वारंवार सांगूनही ते मूग गिळून गप्प बसले आहेत. तलाठ्यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यामागे नेमके कोणते कारण आहे? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल अधिकारी या वाळू तस्करीला लगाम का घालत नाही हे आता लपून राहिले नाही. लपूनछपून बर्‍याच गोष्टी घडत असल्याचे ग्रामस्थांसमोर उघड होऊ लागले आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी आता येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला असून लवकरच यासंदर्भात आंदोलन छेडले जाणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या