कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगाव शहरालगत गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर मध्यरात्री मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शनिवार, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे . हा मालवाहू ट्रक कर्नाटकातील विजापूर येथून गुजरातच्या दिशेने जात होता. दरम्यान, गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावर अचानक ट्रकने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या विळख्यात सापडला.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच कोपरगाव नगरपरिषद आणि संजीवनी उद्योग समूहाच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. दरम्यान, या आगीमुळे नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती. मात्र, कोपरगाव शहर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करत काही वेळातच मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. या भीषण आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.




