अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सोशल मीडियाचा गैरवापर करून कोपरगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या (वय 17) नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून तिच्यासह कुटुंबाची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी (9 डिसेंबर) अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पीडितेच्या नावाचा वापर करून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या खात्यावरून संशयित आरोपीने पीडितेच्या शेजारी राहणार्या एका व्यक्तीला मॅसेज पाठवले. या कृतीमुळे पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी झाली. सदरचा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीच्या व तिच्या कुटुंबाच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरूध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा तपास करत आहेत. सायबर पोलीस बनावट खाते तयार करणार्या अज्ञात आरोपीचा तांत्रिक तपास करत आहेत. अशाप्रकारे सोशल मीडियावर होणार्या बदनामी आणि फसवणुकीच्या प्रकारांविरोधात नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.




