कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहरात गेल्या चार वर्षांपासून शस्त्रांच्या जोरावर दहशत निर्माण करणार्या आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर पोलीस प्रशासनाने हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे. टोळीप्रमुख सागर उर्फ मोद्दा रामदास मंजुळ आणि त्याच्या दोन प्रमुख साथीदारांना अहिल्यानगर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जारी केले आहेत.
प्रस्तुत टोळीने कोपरगाव शहरात आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये दहशत बसवण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, दंगल घडवणे आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिकाच लावली होती. या टोळीच्या गुंडगिरीमुळे सामान्य नागरिक इतके भयभीत होते की, त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी किंवा साक्ष देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. सन 2020 ते 2024 या काळात या टोळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी या टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी या प्रस्तावाची सखोल चौकशी करून अहवाल दिला.
या चौकशीअंती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी टोळीप्रमुख सागर उर्फ मोद्दा रामदास मंजुळ, अतुल देविदास आव्हाड आणि भारत भाऊसाहेब आव्हाड यांना जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीवर भादंवि कलम 307 (जिवे मारण्याचा प्रयत्न), 354 (विनयभंग), 326 आणि आर्म्स क्टनुसार तब्बल 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत नयन गोविंद शिंदे, आकाश सखाराम माकोणे आणि विकी किशोर शिंदे यांचाही टोळी सदस्य म्हणून समावेश आहे.
जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, वाळू चोरी आणि अवैध शस्त्र बाळगणार्या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासन आक्रमक झाले असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची मोहीम सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला आहे.




