Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगाव : 29 ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू

कोपरगाव : 29 ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी काल बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी सरपंच पदाचे आरक्षण निवडणुका झाल्यानंतर होणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे पुर्वी इतका उत्साह या निवडणुकीत दिसून येत नाही.

करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासकराज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे .

त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली.

त्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कोपरगाव मतदार संघातील उक्कडगाव, तिळवणी, अंजनापूर, घारी, मनेगाव, मळेगाव थडी, सांगवी भुसार, वेळापूर, जेऊर पाटोदा, काकडी म. नाटेगाव, कासली, ओगदी, आंचलगाव, कोळगाव थडी, मायगाव देवी, हिंगणी, रवंदे, संवत्सर, देर्डे चांदवड, मढी खुर्द, मढी बुद्रुक, धोंडेवाडी, सोनारी, आपेगाव, येसगाव, टाकळी, कोकमठाण, जेऊर कुंभारी या 29 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख बुधवार 23 डिसेंबर ते बुधवार 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत मात्र 25,26,27, डिसेंबर हे तीन दिवस सुट्टीचे वगळून राहणार आहे. अर्ज छाननी गुरुवारी 31 डिसेंबर रोजी, अर्ज माघारी घेण्याची मुदत, 4 जानेवारी दुपारी 3 वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल, मतदान शुक्रवारी 15 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राहील.

मतमोजणी सोमवारी 18 जानेवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळपासून सुरू होईल. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली. त्यांना मदत म्हणून निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे हे काम करीत आहेत . त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करत असताना ग्रामीण भागात निवडणुकांची जोरदार धामधूम पाहायला मिळणार आहे. करोना संबंधीच्या नियमांचे पालन करून निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या