Friday, May 3, 2024
Homeनगरकोरेगव्हाण सोसायटीचा ‘तो’ सचिव निलंबीत

कोरेगव्हाण सोसायटीचा ‘तो’ सचिव निलंबीत

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये सचिवांनी गैरकारभार केल्याची प्रकरणे ताजी असतानाच आता त्यात कोरेगव्हाण सेवा संस्थेची भर पडली आहे.

- Advertisement -

कोरेगव्हाण येथील सेवा सोसायटीच्या तत्कालीन सचिवाने शेतकर्‍यांची कर्जाची मागणी नसताना देखील त्यांच्या नावावर परस्परच कर्ज घेऊन लाखोंचा गैरव्यवहार केला होता. या प्रकरणाची चौकशी होऊन कोरेगव्हाण सोसायटीचा तत्कालीन सचिव संदीप सोपान मापारे यास अहमदनगर जिल्हा स्तरीय समिती सचिव सुदाम रोकडे यांनी निलंबित केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, कोरेगव्हाण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तत्कालीन सचिवाने संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची दिशाभूल करत तब्बल 23 शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर 13 लाख 31 हजार 389 रुपयांचे कर्ज काढले होते. ही माहिती पत्रकार जितेंद्र आढाव यांनी कोरेगव्हाण सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालावरून माहिती अधिकारातून मिळवून हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता.

श्रीगोंदे सहा. निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आढाव यांनी तशी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सहा. निबंधक रावसाहेब खेडकर यांनी चौकशी करून तसा अहवाल जिल्हास्तरीय समिती व जिल्हा उपनिबंधक यांना सादर केला होता. सचिव संदीप मापारे याच्याकडून ती गैरव्यवहार केलेली रक्कम वसूल करण्यात आली होती. मापारे याने शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर सव्वा तेरा लाख रुपये उचलल्याचा गैरव्यवहार सिद्ध झाला होता.

सचिव मापारे याची खातेनिहाय चौकशी करून त्याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी पत्रकार आढाव यांनी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर व सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. अहमदनगर जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव सुदाम रोकडे यांनी दि. 6 रोजी कोरेगव्हाण सेवा सोसायटीचा तत्कालीन सचिव संदीप मापारे यास सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

दरम्यान काही सहकारी संस्थांमध्ये वाढलेले गैरव्यवहार यात संस्थांचे सचिव हे गैरकारभाराला जबाबदार असल्याचे सिध्द झाले आहे. यात इतरही सहभागी आहेत. याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या