अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहराच्या मध्यवर्ती भागाची कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले कोतवाली पोलीस ठाणे सध्या अहमदनगर शहर सहकारी बँकेचा बनावट सोने तारण घोटाळा उघडकीस आल्यापासून चर्चेत आहे. त्यांनी केलेली कामगिरीही कौतुकास्पद आहे. परंतू, गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत गटबाजीमुळे पोखरलेल्या गुन्हे प्रगटीकरण शाखा (डिबी) बरखास्त करण्याची वेळ प्रभारी अधिकार्यांवर आली आहे.
या ‘डिबी’ पथकाचे ‘डिटेक्शन कमी अन् भानगडीच जास्त’ असल्याचे समोर आले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी हाती घेल्यानंतर दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यात ‘डिबी’ पथकाने धडाका लावला होता. हद्दीत घडणार्या चोर्या, घरफोड्या बरोबरच अवैध धंद्यावर कारवाई करून निरीक्षक शिंदे यांच्या टिमने छाप पाडली. काही दिवस सुरळीत सुरू असलेला कारभाराला गटबाजीचे ग्रहण लागले. यामुळे एकमेकांची उणेधुणे बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. यामुळे दाखल होणार्या गुन्ह्याचे ‘डिटेक्शन’ करण्याकडे दुर्लक्ष होवू लागले.
तब्बल 14 अंमलदारांचा सहभाग असलेल्या ‘डिबी’चे कामकाज अपेक्षीत नव्हते. काही ठराविक अंमलदार प्रामाणिकपणाने गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत होते. तर काही ‘भानगडी’ करण्यात व्यस्त होते. कापडबाजारातील चार ते पाच दुकाने एकावेळी फोडून चोरट्यांनी कोतवाली पोलिसांना लक्ष केले. दुसरीकडे केडगाव उपनगरातील लिंकरोडवरील चार ते पाच ठिकाणी झालेल्या घरफोड्या, स्टेशन रोडवरील घरफोडीचा तपास करण्यात ‘डिबी’ पथकाला यश आले नाही. यामुळे 14 लोकांची भरती असलेल्या ‘डिबी’ची कामगिरी काय? असा प्रश्न उपस्थित होवू लागला होता.
कापडबाजारातील घरफोड्यांचा तपास करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकार्यांनी देवून देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आता प्रभारी अधिकार्यांनी ‘डिबी’ बरखास्त केली आहे. नवीन ‘डिबी’ स्थापन करून गुन्ह्याचे ‘डिटेक्शन’ करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
‘त्या’ अंमलदारांचा विचार व्हावा
‘डिबी’ मध्ये नियुक्ती नसलेले परंतू पोलीस ठाण्यातील इतर कामे प्रामाणिकपणे करणारे अनेक अंमलदार आहेत. त्यांच्यातील कौशल्याचा विचार करून त्यांना नवीन डिबीमध्ये सहभागी करून घेतल्यास हद्दीत घडणारे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचा मोठा हातभार लागेल. मात्र ठराविक अंमलदारांची चलती असल्याने प्रामाणिकपणे काम करणार्या आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे कौशल्य असलेल्या अंमलदारांना संधी मिळत नाही.