Wednesday, May 15, 2024
Homeनगरनदी पात्राची मूळ रुंदी, नदीची हद्द निश्चित करण्याचे काम मनपाचे

नदी पात्राची मूळ रुंदी, नदीची हद्द निश्चित करण्याचे काम मनपाचे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्थानिक स्वराज्य संस्थेने मागणी केल्यानंतर नदी किनारी पूररेषेची आखणी करणे एवढेच जलसंपदा विभागाचे कार्यक्षेत्र आहे. यामुळे जलसंपदा विभाग पुराच्या पाण्याचा विसर्ग प्रवाहाच्या निषिध्द व नियंत्रण रेषा याबाबत आखणी करु शकते. नदी पात्राची मूळ रुंदी, नदीची हद्द, नदी शेजारील गट क्रमाकांची हद्द याबाबत हद्द निश्चित करण्याचे काम नगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येते, असे स्पष्ट करत कुकडी पाटबंधारे विभागाने सिना नदी पात्राच्या हद्द निश्चितीबाबत हात वर केले आहेत. अंतिम हद्द निश्चितीसाठी महापालिकेकडील शहर विकास आराखड्यानुसार व नदी शेजारील गट धारकांच्या गटाची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून होणे गरजेचे असल्याचेही कुकडी पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीच्या पात्राची हद्द निश्चिती व पूर नियंत्रण रेषेच्या आखणीबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी पात्रात अतिक्रमणे असल्याने ही मोहीम थांबवण्यात आली आहे. कुकडी पाटबंधारे विभागाने या कार्यवाहीचा अहवाल सादर केला आहे. सध्या अस्तित्वात असणारे नदीचे प्रत्यक्ष अस्तित्वातील पात्र व त्या पात्राच्या मध्यापासून नदीच्या दोन्ही तीरावरील 50 मीटर अंतर टाकून सद्यस्थितीत नदीची रुंदी 100 मीटर पर्यंत मोजणी केली जात आहे.

आत्तापर्यंत 1200 मीटरपर्यंत मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. सदर काम हे फक्त नदी पात्र रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे व अतिक्रमण काढण्याचे आहे. नदीचा पूरप्रवाह जाण्यासाठी नदीची रुंदी आवश्यक आहे. तेवढ्याच रुंदीचे प्राथमिक मोजमाप केले जात आहे. सदरच्या खुणा नदीची अंतीम हद्द निश्चिती नाही, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. सध्याच्या नदीपात्रानुसार पाटबंधारे विभागाने सन 2018 मध्ये सीना नदीची पूररेषा आखणी केलेली आहे.

सध्या नदीतील अतिक्रमणे, झाडे झुडपे, गाळ, कचरा यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून नदीच्या पुलांच्या जुन्या खुणावरून नदीचे 100 मीटर रुंदीचे पात्र अतिक्रमणमुक्त करण्यासाठी व पुराचा प्रवाह सहजरित्या वाहून जाण्यासाठी खुणा केल्या आहेत. या खुणा नदीची हद्द समजू नये, असे म्हणत सीना पात्राच्या हद्द निश्चितीबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबतही संभ्रम निर्माण केला आहे.

नदीच्या हद्द निश्चितीसाठी आवश्यक कार्यवाही

सीना नदीची हद्द निश्चितकरण्यासाठी महापालिकेकडील शहर विकास आराखड्यानुसार सीना नदी काठच्या सर्व गटाची भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रत्यक्ष मोजणी करणे. मोजणीनंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून ज्या खुणा करुन दिल्या जातील, त्या महापालिकेने जतन करुन खुणांच्या आतील भाग हा सीना नदीचे मूळ क्षेत्र म्हणून संरक्षित करावे. मूळ संरक्षित क्षेत्राच्या दोन्ही बाजूने रस्त्याची आखणी करावी, अशा सूचना कुकडी पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या