मुंबई | Mumbai
कुर्ला पश्चिमेकडे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे संपूर्ण मुंबई हादरली. कुर्ल्यात भरधाव वेगाने आलेल्या एका बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक देत नागरिकांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० पेक्षा अधिक जण जखमी आहे. तर अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्या बेस्ट बसमुळे हा अपघात झाला त्या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास मुंबईच्या कुर्ल्यात एलबीएस रोडवर अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगाने आलेल्या बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला.
या अपघातास कारणीभूत असलेला बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून पोलिसांच्या तपासात मोठी माहिती उघड झाली आहे. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. संजय मोरे याच्याकडून बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे ती गर्दी शिरली असे सांगितले जात आहे. मात्र, संजय मोरे याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते का, यासाठी पोलिसांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याशिवाय, या अपघातासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत मानली जात आहे. ती म्हणजे चालक संजय मोरे याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा नसलेला अनुभव.
तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार, चालक संजय मोरे हा १ डिसेंबर रोजी कंत्राटीपद्धतीने कामावर रूजू झाला होता. मोरया या कंपनीनेने बेस्टला हा चालक दिला होता. मोरया ही कंपनी बेस्टला चालक देण्याचे काम करते. रूजू झाल्यानंतर ३ महिन्यांचे ट्रनिंग चालकाला दिले जाते पण संजय मोरे यांना ट्रेनिंग दिले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कामावर रूजू झाल्यापासून चालक संजय मोरेने ९ दिवस मॅन्युअल बस चालवली पण अपघाताच्या काही तासांपूर्वी चालकाला अँटोमॅटीक बस चालवण्यासाठी दिली. या बसचा अंदाज नसतानाही चालकाने आगाराबाहेर बस काढली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच कुर्ला एलबीएस रोडवर या बसने अनेकांना चिरडले.
चालकाकडे मिनी बस चालवण्याचा अनुभव
संजय मोरे हा मिनी बस चालवायचा. त्याच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे. पोलिसांनी त्याचा परवाना जप्त केला आहे. या आधी संजय मोरे हा मीनी बस आणि इतर गाड्या चालवायचा त्याला मोठ्या गाड्या चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, असेही चौकशीत समोर आले आहे.
बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाही
पोलिसानी इलेक्ट्रिक बस बनवणारी कंपनी आणि काही तज्ञांशी संवाद साधला. इलेक्ट्रिक बस पूर्णपणे सुस्थितीत आहे बसमध्ये कुठलाही बिघाड नसल्याचे समोर आले आहे. इलेक्ट्रिक बसमध्ये ब्रेक फेल झाल्यावर किंवा काही मोठा तांत्रिक बिघाड झाल्यास बस पुढे जात नाही असा तज्ज्ञांचा दावा आहे. बेस्टकडे असलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये ही व्यवस्था आहे त्यामुळे अपघातग्रस्त बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा खोटा असल्याची माहिती तज्ज्ञांनी पोलिसांना दिली.
मोरेने मद्यप्राशन केले होते का?
बेस्टचालक संजय मोरे याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली होती. त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीत संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे. मग हा अपघात नेमका कसा घडला, या प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.