मुंबई । Mumbai
राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता अखेर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मकर संक्रांतीच्या तोंडावर आणि महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वी राज्य सरकारने महिलांना हा मोठा दिलासा दिला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील अनेक महिलांच्या मोबाईलवर १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश धडकू लागले आहेत.
राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात सरकारी योजनांचे पैसे वाटप करण्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः महायुतीतील काही नेत्यांनी संक्रांतीनिमित्त ३००० रुपये (डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित) दिले जातील, असे दावे सोशल मीडियावर केले होते. या प्रकरणाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांकडून स्पष्टीकरण मागवले होते.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ज्या योजना निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाल्या आहेत, त्या सुरू ठेवण्यास आचारसंहितेचा अडथळा नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा ‘अग्रिम’ (Advance) लाभ देता येणार नाही. तसेच नवीन लाभार्थ्यांची निवड करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या तांत्रिक बाबींमुळे महिलांना ३००० ऐवजी नियमित हप्त्याचे १५०० रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आगाऊ रक्कम दिल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल, असा दावा विरोधकांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत आयोगाने जानेवारी महिन्याचा हप्ता आगाऊ स्वरूपात देण्यास स्पष्ट मज्जाव केला आहे. केवळ डिसेंबर महिन्याचा थकीत किंवा नियमित हप्ताच वितरित करण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे संभ्रमाची स्थिती दूर होऊन महिलांना हक्काचे पैसे मिळत आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी हे पैसे खात्यात जमा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आचारसंहितेच्या नियमांचे पालन करत, जुन्या लाभार्थ्यांना त्यांचा नियमित हप्ता वेळेत मिळाल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




