अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र महिलांना या योजनेत पैसेच मिळाले नाहीत. ई-केवायसी करताना या त्रुटी राहिल्यामुळे या महिलांचे पैसे जमा झाले नसल्याची माहिती आता समोर येवू लागली आहे.
लाडकी बहिण योजनेचा लाभ अचानक बंद झाल्याने नगरसह राज्यभरात अनेक ठिकाणी महिलांमध्ये संताप व्यक्त होत असताना आता महिला बालकल्याण विभागाने पैसे बंद झालेल्या महिलांच्या खात्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्ह्यात अशा प्रकारे एक लाखांहून अधिक महिलांचे जानेवारी महिन्यांचे पैसे आले नसल्याचा अंदाज आहे. पैसे न आलेल्या या महिलांच्या खात्यांची पडताळणी करून त्यांची माहिती महिला बालकल्याण खात्याला सादर करण्यात येणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. ही ई-केवासी करताना काही कारणास्तव महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला. मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी आता महिला आंदोलन करत आहेत. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणार्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात साधारणपणे 1 लाखांहून अधिक महिलांकडून ई-केवायसी करतांना चूक झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे या महिलांचे जानेवारी महिन्यांचे पैसे आलेले नाहीत. नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे 20 ते 25 टक्के महिलांकडून ही चूक झालेली असून आता सरकारच्या आदेशानूसार नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे जानेवारी महिन्यांचा लाभ न मिळालेल्या लाडक्या बहिण्याच्या बंद असणार्या खात्याची पडताळणी करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाला सादर करणार आहेत.
कुटूंबातील कोणी शासकीय सेवेत आहे ?
लाडकी बहिण योजनेची ई-केवायसी करतांना तुमच्या कुटूंबातील कोणी शासकीय सेवेत आहे? या प्रश्नाचे होय- नाही या स्वरूपात उत्तर देतांना अनेक महिलांकडून कुटूंबातील कोणीच शासकीय सेवेत नसतांना या प्रश्नाचे उत्तर होय असे देण्यात आले. यामुळे जर कुटूंबातील कोणी व्यक्त शासकीय सेवेत असल्यास या योजनेचा लाभ कसा मिळणार यामुळे संबंधीत महिलांचे जानेवारी महिन्यांचे लाडक्या बहिण योजनेचे पैसे आलेले नाहीत.
दुरुस्तीचा पर्यायच उपलब्ध नव्हता
ई-केवायसी पूर्ण झाल्यावर त्यात झालेली चूक सुधारण्यासाठी पोर्टलवर कोणताही एडीट किंवा करेक्शनचा पर्याय देण्यात आलेला नव्हता. हिच सर्वात मोठी तांत्रिक अडचण ठरली असून चुकीच्या माहितीमुळे एकदा अपात्र ठरलेली महिला कायमची लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या पात्र असणार्या 20 ते 25 टक्के महिलांकडून ई-केवायसी करतांना चुका झालेल्या आहेत. जानेवारी महिन्यांचे पैसे न आल्याने संबंधीत महिलांनी केलेल्या ओरडनंतर केलेल्या तपासणीत झालेल्या ही समोर आली आहे.




