अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे एकट्या नगर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 655 लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या आहेत. या लाडक्या बहिणींचा जानेवारी महिन्यांचा हप्ता होल्डवर असून आता या सर्वांची गावनिहाय अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात ई-केवायसीमध्ये अडचणी झालेल्यांची यादी राज्य सरकारच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा महिला बालकल्याण विभागाला पाठवण्यात आल्या आहेत.
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती. ही ई-केवासी करताना काही कारणास्तव महिलांकडून चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आला. मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत.
त्यामुळे ठिकठिकाणी आता महिला आंदोलन करत आहेत. अर्ज भरताना तांत्रिक प्रश्नांच्या अज्ञानामुळे हजारो पात्र महिलांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. परिणामी, नियमित हप्ते मिळणार्या अनेक महिलांचा लाभ अचानक बंद झाला आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 655 महिलांकडून ई-केवायसी करतांना चूका झालेल्या आहेत. यामुळे या महिलांचे जानेवारी महिन्यांचे पैसे आलेले नाहीत. नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे 20 ते 25 टक्के महिलांकडून ही चूक झालेली असून आता सरकारच्या आदेशानूसार नगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी हे जानेवारी महिन्यांचा लाभ न मिळालेल्या लाडक्या बहिण्याच्या बंद असणार्या खात्याची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार राज्य पातळीवरून प्रत्येक जिल्ह्याला ई- केवायसीमध्ये अडचण झालेल्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे. या यादीनूसार संबंधीत जिल्हा महिला बालकल्याण विभागाने अंगणवाडी सेविकांमार्फत गावनिहाय संबंधीत लाडक्या बहिणींची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
ई-केवासी होणार्या तालुकानिहाय बहिणी
जामखेड 4 हजार 334, पारनेर 6 हजार 304, पाथर्डी 7 हजार 115, राहाता 10 हजार 25, राहुरी 9 हजार 292, संगमेनर 16 हजार 417, शेवगाव 6 हजार 89, श्रीगोंदा 7 हजार 405, श्रीरामपूर 7 हजार 549, अकोले 9 हजार 192, कर्जत 6 हजार 345, कोपरगाव 8 हजार 825, नगर 17 हजार 230 आणि नेवासा 9 हजार 533 असे आहेत.
8 हजार 160 65 वर्षापुढील
ई- केवायसीमध्ये अडचण झालेल्यामध्ये 8 हजार 160 महिला या 65 वर्षापुढील आहेत. यात सर्वाधिक नेवासा तालुक्यातील 902 असून सर्वात कमी पारनेर तालुक्यातील 355 आहेत. यासह 3 हजार 564 महिला 21 वर्षाखालील आहेत. तसेच 512 महिला या तृतीयपंथी आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या नकारामुळे पेच
ई-केवासीत अडचण झालेल्या लाडक्या बहिणींची यादी सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला पाठवण्यात आलेली आहे. या यादीनूसार आता अंगणवाडी सेविकांना त्यात्या गावात संबंधीत महिलांची पडताळणी करावी लागणार आहे. मात्र, सध्या तरी राज्य पातळीवरून या कामास अंगणवाडी सेविका संघटनेच्यावतीने नकार देण्यात आलेला आहे. जिल्हा पातळीवर देखील हे काम अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्यास पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.





